मध्यप्रदेशमधील जबलपूरचा ऐतिहासिक दुर्गाेत्सव !

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…

जबलपूर येथे बसवण्यात येणारी दुर्गादेवीची एक मूर्ती

जबलपूरचा दुर्गा उत्सव अद्वितीय आहे. संपूर्ण देशात रामलीला, दुर्गाेत्सव आणि दसरा मिरवणूक यांचा अद्भुत अन् भव्य संगम कदाचित् केवळ जबलपूरमध्ये बघायला मिळतो. या दुर्गाेत्सवाची परंपरा कशी चालू झाली, ते येथे देत आहोत. ५ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘जबलपूर येथील दुर्गा उत्सवाची मुहूर्तमेढ, नवरात्रोत्सवातील रामलीला भाविकांचे आकर्षण आणि जबलपूर दुर्गा उत्सवामध्ये नागपूरमधील मूर्तीकारांचा सहभाग’, यांविषयीचे लिखाण वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/840768.html

५. कोलकाता येथील मूर्तीकारांनी बनवलेल्या बंगाली शैलीतील मूर्ती भाविकांचे विशेष आकर्षण

असे असले, तरी कोलकाताहून आलेले जगदीश बिस्वास हे जबलपूरच्या दुर्गा उत्सवाचे विशेष आकर्षण होते. बंगाली शैलीतील अनेक मूर्ती त्यांनी आणि त्यांच्या भावाने बनवल्या. सुमारे ५५ ते ६० वर्षांपूर्वी त्यांना ‘टेलिग्राफ वर्कशॉप’च्या दुर्गा उत्सव समितीने बोलावले होते. जगदीश बिस्वास आणि त्यांचा चमू टेलिग्राफ कॉलनीतील रुग्णालयात दुर्गा उत्सवाच्या मासभर आधीपासून मूर्ती बनवायला प्रारंभ करायची. त्या काळात टेलिग्राफ कॉलनी आणि शारदा टॉकीज, गोरखपूर येथील त्यांची २ शिल्पे भव्यतेच्या श्रेणीत होती. जवळपास सर्वच मूर्ती दुर्गादेवीच्या होत्या. बंगाली मंडपांमध्ये गणेश, सरस्वती, कार्तिकेय आदींचीही उपस्थिती होती. एक अपवाद म्हणून कछियानाच्या समितीसाठी ते खाली पडलेल्या शंकरावर उभी असलेली महाकालीची मूर्ती बनवत असत.

श्री. प्रशांत पोळ

हळूहळू जबलपूरचे शिल्पकार त्यांची कला सुधारत राहिले. महाराष्ट्र शाळेसमोर ठेवलेल्या मूर्तीमध्ये कलेच्या आविष्काराचे दर्शन घडवत राहिले. अनेक मूर्तीकार पारंपरिक शैलीत सुंदर मूर्ती घडवत राहिले. आजही शीतलामाईजवळ मोठ्या प्रमाणात भव्य सुंदर मूर्ती बनवल्या जातात. संतोष प्रजापती हे आजच्या मूर्तीकारांमध्ये एक अग्रगण्य नाव आहे.

६. काही दुर्गाेत्सवांवर भाविकांची अतूट श्रद्धा

काही उत्सव समित्यांविषयी लोकांमध्ये अतूट श्रद्धास्थान निर्माण झाले आहे. गढाफाटकची आणि पडावची महाकाली ही श्रद्धेचे एक अद्भुत प्रतीक बनली आहे. सुनरहाई आणि नुनहाई येथील पारंपरिक बुंदेली शैलीतील मूर्त्या जबलपूरसाठक्ष भूषणावह आहेत. सुनरहाईच्या देवीला ‘नगर सेठानी’ म्हटले जाते. सुनरहाईच्या समोरच एक भव्य देवीची मूर्ती स्थापित केली जाते. त्यात पौराणिक कथांचे नेत्रदीपक सादरीकरण केले जाते. मोहन शशी यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराच्या लेखणीतून साकारलेली ही कथा भक्तांना भुरळ पाडते.

जबलपूरच्या उपनगरातील देवीच्या मूर्तीही आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. मंडला मार्गावरील बिलहारी येथे स्थापित केलेली दुर्गामूर्ती अनेक वर्षांपासून भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. रांझी, गढा आणि सदर येथील अनेक मूर्ती आकर्षणाचे केंद्र रहात आल्या आहेत. सप्तमीपासून विजयादशमीपर्यंत संपूर्ण जबलपूरवासिय रस्त्यावर उतरल्याचे दिसते. शहराचा प्रत्येक कोपरा दिव्यांनी उजळून निघतो. या दुर्गोत्सवाचा आणि दसर्‍याचा आनंद लुटण्यासाठी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थही शहरात येतात. दसर्‍याच्या एक दिवस आधी, म्हणजेच नवमीला ‘पंजाबी दसरा’ साजरा केला जातो. पूर्वी जेव्हा तो ‘राईट टाऊन स्टेडियम’वर व्हायचा, तेव्हा त्याच्या भव्यतेचे आकलन करणेही कठीण होते. मुलांसाठी हे विशेष आकर्षण होते.

७. जबलपूरच्या दुर्गाेत्सवाला अवश्य भेट द्या !

जबलपूर हे भारतातील सर्व संस्कृतींना सामावून घेणारे शहर आहे. हे सर्व लोक दुर्गा उत्सव आणि दसरा मोठ्या उत्साहाने, ऊर्जेने अन् अभिमानाने साजरे करतात. हा प्रत्येकाचा उत्सव आहे. त्यामुळे एकीकडे गरबा चालू असतो, तर दुसरीकडे सिटी बंगाली क्लब आणि डीबी बंगाली क्लब येथे बंगाली नाटके रंगवली जातात. छोटा फुआरा, गढा, घमापूर, सदर, गोकलपूर, रांझी आदी ठिकाणी रामलीला रंगते, तर दुसरीकडे मराठी समाज दत्त मंदिरात अष्टमीचा खेळ खेळला जातो. शेकडो देवी मंडपांमध्ये देवीची पूजा, सप्तशतीचे पठण, होम, तर ठिकठिकाणी रस्त्यावर भंडारा आयोजित केला जातो. या उत्सवाच्या रंगांचा आनंद लुटण्यासाठी नवरात्रीच्या कालावधीत निश्चित जबलपूरला भेट द्या !’

(समाप्त)

– श्री. प्रशांत पोळ, अभियंता आणि लेखक, जबलपूर, मध्यप्रदेश.