सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…
१. जबलपूर येथील दुर्गा उत्सवाची मुहूर्तमेढ
‘जबलपूरचा दुर्गाेत्सव हा अद्वितीय आहे. संपूर्ण देशात रामलीला, दुर्गाेत्सव आणि दसरा मिरवणूक यांचा अद्भुत अन् भव्य संगम कदाचित् केवळ जबलपूरमध्ये बघायला मिळतो. भारतातील वर्ष १८५७ चे क्रांतीकारी युद्ध संपल्यानंतर काही वर्षांनी ब्रिटिशांनी बाँबे-हावडा रेल्वेमार्गाचे काम चालू केले. हा रेल्वेमार्ग वर्ष १८७० मध्ये चालू झाला. जबलपूर हे या मार्गाचे महत्त्वाचे रेल्वेस्थानक होते. रेल्वेनिर्मितीच्या निमित्ताने अनेक बंगाली कुटुंबीय जबलपूरमध्ये स्थायिक झाली आणि वर्ष १८७२ मध्ये प्रथमच एक नवीन ऐतिहासिक परंपरा चालू झाली. ब्रिजेश्वर दत्त यांच्याकडे दुर्गादेवीची मातीची मूर्ती बसवण्यात आली. ३ वर्षांनंतर हा महोत्सव अंबिकाचरण बंदोपाध्याय (बॅनर्जी) यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला. वर्ष १८७८ मध्ये सुनरहाई येथे कलमान सोनी यांनी बुंदेली शैलीतील दुर्गामूर्तीची स्थापना केली. या मूर्तीचे मूर्तीकार मिन्नी प्रसाद प्रजापती होते.
त्या काळात गढा ही एक परिपूर्ण आणि संघटित वस्ती होती. गढावासियांनी हा सण हाती घेतला. त्यानंतर हा उत्सव जबलपूरच्या इतर भागात चालू झाला. देवीची मूर्ती घडवण्यासाठी जबलपूरचे कारागीर पुढे आलेच; पण जबलपूर हा ज्या ‘सीपी अँड बेरार’ प्रांताचा भाग होता, त्याची राजधानी असलेल्या नागपूर येथूनही मूर्तीकार येऊ लागले. हळूहळू दुर्गा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होऊ लागला. मूर्ती विसर्जनासाठी दसरा विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ झाला, ज्याने इतिहास रचला !
२. दुर्गा उत्सवाचा विस्तार
एकेकाळी जबलपूरचा दसरा चल सभारंभ, ज्यात दुर्गामूर्तीही विसर्जनासाठी सहभागी होत होत्या. ही मिरवणूक अत्यंत भव्य असायची. त्यात अनुमाने १२५ हून अधिक दुर्गामूर्ती असायच्या. ही मिरवणूक २४ घंटे चालत होती. कालांतराने शहर मोठे होत गेले. त्यात उपनगरांची भर पडत गेली आणि साहजिकच दसरा मिरवणुकीचे विकेंद्रीकरण झाले. सध्या मुख्य मिरवणुकीसमवेतच गाढा, सदर, कांचघर, रांझी आदी भागात भव्य मिरवणुका काढल्या जातात. दसर्याचा जल्लोष आणि या सणाचा उत्साह संपूर्ण जबलपूर परिसरात सारखाच पसरलेला दिसतो.
३. नवरात्रोत्सवातील रामलीला भाविकांचे आकर्षण
जबलपूर हे उत्सवी शहर आहे. या शहराने उत्तरप्रदेशातील रामलीला स्वीकारली. दुर्गा उत्सव चालू होण्यापूर्वी वर्ष १८६५ मध्ये मिलौनीगंजमध्ये गोविंदगंज रामलीला समितीने रामलीला चालू केली, जी आजपर्यंत चालू आहे. मशाली आणि चिमणी यांच्या प्रकाशात चालू झालेली ही रामलीला आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आणि म्हणूनच ती आजही प्रासंगिक आहे. त्याला भाविक प्रचंड गर्दी करतात. ही रामलीला पारंपरिक आणि सात्त्विक स्वरूपात साकारली जाते. रामलीला सादरीकरणाच्या दिवसांमध्ये त्याची पात्रेही पूर्णत: सात्त्विक जीवन जगतात. याच रामलीलेच्या धर्तीवर गढा, सदर, घमापूर, रांझी आदी अनेक ठिकाणी त्याच भक्तीभावाने रामलीला सादर केली जाते. सप्तमीपासून दसर्यापर्यंत जबलपूरचे वैभव आणि लोकांचा उत्साह यांची तुलनाच होऊ शकत नाही.
४. नागपूर येथील मूर्तीकारांचा सहभाग
जबलपूर येथे अनुमाने ६०० ते ७०० भव्य मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. पूर्वी प्रमुख उत्सव समित्यांसाठी नागपूरच्या मूर्तीकारांकडून मूर्ती सिद्ध केल्या जात होत्या. जुने बसस्थानक (सुपर बाजार) येथील मूर्ती श्री. मूळचंद साकारत होते, तर शंकर तूप भंडार (भाजी मंडई), गल्ला मंडई आणि हरदोल मंदिर (गंजीपुरा) यांच्या मूर्ती श्री. सुधीर बनवत होते. अनेक वर्षांपूर्वी श्री. सुधीर यांनी बनवलेली सिंहाच्या रथावर आरूढ असलेली भाजी मंडईत स्थापन केलेली मां जगत्जननीची मूर्ती आजही अनेकांच्या स्मरणात असेल. नागपूरची ही परंपरा
श्री. शरद इंगळे यांनी आजतागायत जिवंत ठेवली आहे. दीक्षितपुरा येथील हितकारिणी शाळेत बसवलेली मूर्ती त्यांच्याचकडून बनवली जाते. मूळचंद, सुधीर, शरद इंगळे हे सर्व कलाकार नागपूरच्या चितार ओळीतून येत असत.
(क्रमशः)
– श्री. प्रशांत पोळ, अभियंता आणि लेखक, जबलपूर, मध्यप्रदेश.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/841638.html