सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीपात्रात सोडल्याचे प्रकरण
ठाणे, ३० सप्टेंबर (वार्ता.) – येथील देसाई खाडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात प्रक्रिया न करता सांडपाणी सोडण्यात येत असल्याप्रकरणी मुंब्रा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने हरित लवादाकडे दाद मागितली होती. वर्षानुवर्षे अशाप्रकारे सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पर्यावरणाची हानी झाली असून ही भरपाई भरून काढण्यासाठी १०२.४ कोटी रुपये हानीभरपाई देण्याचे आदेश पुणे हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. ठाणे महानगरपालिकेला हा दंड ठोठावला.
२७ सप्टेंबर या दिवशी या संदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये हरित लवादाने हे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांच्या अर्जावर सुनावणी देतांना न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंग आणि तज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांच्या खंडपिठाने २ महिन्यांच्या आत बोर्डाकडे रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
संपादकीय भूमिकामहापालिका स्वतःच जर प्रदूषणास उत्तरदायी असेल, तर तिला इतरांना याविषयी काही सांगण्याचा अधिकार राहील का ? |