गुन्हे मागे घेऊन सुरक्षा पुरवण्याची नागरिकांकडून मागणी
गंगापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ २३ सप्टेंबर या दिवशी हिंदु समाजाच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. महाराजांवरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना कडक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ आणि भक्त यांनी केली आहे.
१. शहरातील लासूर नाका परिसरातील गणपति मंदिर परिसरात तालुक्यातील रामगिरी महाराज भक्त परिवार आणि हिंदु समाजातील कार्यकर्ते सकाळी संघटित झाले. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला.
२. आंदोलकांनी ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा दिल्या. नंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले.
३. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर, ‘गंगागिरी महाराज गुरुकुल’चे नवनाथ महाराज म्हस्के, ‘सुदर्शन वृत्तवाहिनी’चे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांची भाषणे झाली.
४. वक्त्यांनी महंत रामगिरी महाराजांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची मागणी केली. याखेरीज बांगलादेशात हिंदु समाजावर अत्याचार करणार्यांच्या विरोधात भारताने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
५. या वेळी डॉ. सुरेश चव्हाणके यांनी ‘एन्.आर्.सी.’ (राष्ट्रीय नागरिकता नोंदणी) कायदा करावा, ‘लव्ह जिहाद’च्या विरुद्ध, तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करण्याची मागणी केली. या वेळी त्यांनी उपस्थितांना साधू-संतांना त्रास होऊ देणार नाही, अशी शपथ दिली. अर्जुन महाराज यांनी प्रास्ताविक केले.