१६ वर्षीय कु. कौशल जोशी यांच्या ‘पुनरुत्थान’ मोहिमेच्या अंतर्गत मूर्ती आढळल्या !
फोंडा, २३ सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती विक्रीवर बंदी असूनही यंदा फोंडा परिसरात श्री गणेशचतुर्थीनंतर विविध विसर्जन स्थळांवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या एकूण २० मूर्ती आढळल्या आहेत. या मूर्तींमुळे जलचर आणि पाण्याची शुद्धता यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. धर्मापूर येथील ‘स्यामंतक युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ’चा विद्यार्थी असलेला १६ वर्षीय कु. कौशल जोशी हा विसर्जन करण्यात आलेल्या श्री गणेशमूर्तींची माती काढून ती पुन्हा स्थानिक मूर्तीकारांना वापरण्यास देण्याची ‘पुनरुत्थान’ मोहीम राबवत आहे. या मोहिमेच्या वेळी कु. कौशल जोशी याला फोंडा परिसरातील ४ विसर्जन स्थळांवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या एकूण २० मूर्ती आढळल्या. विसर्जनानंतर एक आठवड्याने कु. कौशल जोशी याने ही मोहीम राबवली होती. कौशल जोशी याने याविषयीची माहिती फोंडा नगरपालिका मंडळ, ‘गोवा स्टेट वेटलँड ॲथॉरिटी’ आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना दिलेली असली, तरी यासंबंधी अजून कुणीही कोणतीही कार्यवाही चालू केलेली नाही.
पाण्यावर होणार्या दुष्परिणामांविषयी जागृती करण्यासाठी ‘पुनरुत्थान’ मोहीम
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती रंगवण्यासाठी करण्यात येत असलेला कृत्रिम रंगांचा वापर आणि मूर्तींच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक आदींमुळे पाण्यावर होणार्या दुष्परिणामांविषयी जागृती करण्यासाठी कु. कौशल जोशी ‘पुनरुत्थान’ मोहीम राबवत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत पाण्यात विसर्जित केलेल्या चिकणमातीच्या मूर्तीची माती गोळा करून ती पुन्हा स्थानिक मूर्तीकारांना देण्यात येत आहे; मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने ‘पुनरुत्थान’ मोहीम राबवण्यास अडचण निर्माण होत आहे.
मोहिमेविषयी अधिक माहिती देतांना कु. कौशल जोशी म्हणाला, ‘‘गतवर्षी ‘पुनरुत्थान’ मोहीम प्रायोगिक तत्त्वावर कुर्टी, फोंडा भागात यशस्वीपणे राबवण्यात आली. स्थानिकांच्या संमतीने या वेळी चिकणमातीच्या १३ मूर्तींची माती स्थानिक पारंपरिक मूर्तीकारांना परत देण्यात आली. गतवर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ५ मूर्ती सापडल्या; मात्र गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आवश्यक सहकार्य न लाभल्याने याविषयी विशेष काही करता आले नाही. वास्तविक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात तरंगतात; मात्र काही मूर्तीकार मूर्ती पाण्यात बुडावी म्हणून मूर्ती सिद्ध करतांना प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये माती मिसळतात. यंदा ‘पुनरुत्थान’ मोहिमेसाठी फोंडा नगरपालिकेने कामगार पुरवले होते; मात्र पाण्यातील मूर्ती काढता आल्या नाहीत.
‘पुनरुत्थान’ मोहिमेला ‘नारी शक्ती’ संघटनेचा पाठिंबा
फोंडा येथील काही मूर्तीविक्रेते गोव्याबाहेरून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती आणतात आणि स्थानिक विक्रेत्यांना अंधारात ठेवून त्याची विक्री करतात. याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती देऊनही मंडळ याविषयी काहीच करत नाही. या मोहिमेला आतापर्यंत केवळ ‘नारी शक्ती’ संघटनेच्या अध्यक्षा अनिता कवळेकर यांनीच पाठिंबा दिला आहे.’’