पुणे – मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वॉरंट बजावण्यात आल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी वानवडी भागातील एकाची पावणेबारा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी एकाने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदाराच्या भ्रमणभाष क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. तुम्ही एका खासगी बँकेकडून पावणेतीन लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. कर्जाची परतफेड न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वॉरंट बजावण्यात आले आहे, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी तक्रारदाराकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी मुंबईत पोलीस दलात असल्याचे सांगून अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, अशी धमकी दिली. तक्रारदाराला चोरट्यांनी एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तक्रारदाराने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी ११ लाख ७९ सहस्र रुपये जमा केले. चोरट्यांनी पुन्हा त्यांच्याकडे पैसे मागितले. त्यामुळे संशय आल्याने तक्रारादराने शहानिशा केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाचोरट्यांना पोलिसांचे भय नसल्याचे उदाहरण ! वेळोवेळी सायबर चोरीच्या घटना उघड झाल्यानंतर चोरट्यांना त्वरित कठोर शिक्षा न झाल्यामुळे चोरीच्या घटनांची पुनरावृत्ती होत आहे ! |