आज भाद्रपद शुक्ल द्वादशी (१५.९.२०२४) या दिवशी वामन जयंती आहे. त्या निमित्ताने…
सत्ययुगात दैत्यराजा बळी होता महापुण्यवान ।
तो होता दानवीर आणि कीर्तीवान ।। १ ।।
दानामुळे झाला बळीराजाला अभिमान ।
त्यामुळे दिव्य शक्ती झाल्या निष्प्राण ।। २ ।।
सर्व देवतांनी विनवले श्रीविष्णूला भयापोटी ।
घ्यावा त्यांनी अवतार देवमाता अदितीच्या पोटी ।। ३ ।।
सृष्टीला तारण्या श्रीविष्णूने घेतले दशावतार ।
वामन असे श्रीविष्णूचा पाचवा अवतार ।। ४ ।।
श्रीविष्णूने वामनाच्या स्वरूपात धारण केले बटू रूप ।
सर्व जण मोहित झाले पाहूनी बटूचे लघु स्वरूप ।। ५ ।।
माता-पित्यांची आज्ञा घेऊन वामन भिक्षुक म्हणून निघाला ।
आणि बटूच्या रूपात बळीराजाच्या द्वारी प्रगटला ।। ६ ।।
वामन आला बळीराजाच्या अश्वमेध यज्ञाच्या ठिकाणी ।
बळीची पुत्री रत्नमाला (टीप १) त्यास पाही मातृत्वाने मोहूनी ।। ७ ।।
श्रीविष्णूला पाहून धावत आला बळीराजा ।
त्याचे चरण धरूनी म्हणाला, सांग तुझी इच्छा ।। ८ ।।
श्रीविष्णूचे बटू रूप शुक्राचार्यांनी ओळखले ।
त्यांनी बळीराजाला वचन देण्यापासून रोखले ।। ९ ।।
परि बळीराजाने शुक्राचार्यांचे नाही ऐकले ।
आणि वामनाला इच्छापूर्तीचे वचन दिले ।। १० ।।
वामन रूप होते अतिशय गोंडस आणि लहान ।
तीन पावले व्यापेल इतक्या भूमीचे मागितले दान ।। ११ ।।
वामनाचे दिव्य रूप पाहून बळीराजाचे हरपले देहभान ।
त्याने विचार न करता वामनाला दिले इच्छित दान ।। १२ ।।
पहाता पहाता वामनाने विराट रूप धारण केले ।
या विराट रूपाच्या विस्ताराने त्रैलोक्य व्यापले ।। १३ ।।
पहिल्या पावलाने वामनाने व्यापला भूलोक ।
दुसर्या पावलाने व्यापले नभ आणि स्वर्गलोक ।। १४ ।।
तिसरे पाऊल ठेवण्यासाठी बळीने दिले मस्तकाचे स्थान ।
श्रीहरीचे पावन चरण झाले बळीच्या माथ्यावर विराजमान ।। १५ ।।
वामनाने चरणाने दाबून बळीला पाताळात नेले ।
पहाता पहाता बळीचे संपूर्ण राज्य नष्ट झाले ।। १६ ।।
प्रभूच्या चरणस्पर्शाने बळीचे गर्वहरण झाले ।
सुतललोकाचे (टीप २) राज्य करण्यास त्याला मिळाले ।। १७ ।।
दैत्यराज बळीला वामनाने केले राज्यासह धनवैभव बहाल ।
त्याच्या प्रार्थनेवरून श्रीहरि झाला सुतललोकाचा द्वारपाल ।। १८ ।।
बळीच्या त्यागामुळे तो झाला महान दानवीर ।
त्याचा उद्धार करणारा वामनावतारही असे महान ।। १९ ।।
अदितीपुत्र वामनावतार असे इंद्राचा लघु भ्राता ‘उपेंद्र’ ।
म्हणूनी त्याच्या गळ्यात पुष्पमाला घाली ऐरावत गजेंद्र ।। २० ।।
वामनावताराने केला अलौकिक पराक्रम ।
म्हणूनी त्यासी नाव मिळाले नाव ‘त्रिविक्रम’ ।। २१ ।।
धन्य धन्य आहात तुम्ही हे श्रीमन्नारायण ।
हे काव्यपुष्प तव चरणी करते सविनय अर्पण ।। २२ ।।
टीप १ – बळीराजाची पुत्री रत्नमाला : ‘वामनाचे बटू रूप पाहून बळीराजाची पुत्री रत्नमाला हिच्या मनात ‘वामन पुत्ररुपात प्राप्त व्हावा’, अशी कामना जागृत झाली. जेव्हा वामनाने विराट रूप धारण करून बळीला सुतललोकात नेले, तेव्हा रत्नमालेच्या मनात बटू वामनाला विषपान करून मारून टाकण्याची इच्छा जागृत झाली. या दोन्ही इच्छा जाणून वामनाने रत्नमालेला ‘तथाऽस्तु’, म्हणजे ‘तसेच होऊ दे’, असे वरदान दिले. त्याप्रमाणे द्वापरयुगात रत्नमाला ही पुतना राक्षसीण झाली आणि तिने श्रीविष्णूचा पूर्णावतार बाळकृष्णाला विषाने भरलेले दुग्धपान करून त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु भगवान श्रीकृष्णाने पुतनेचेच प्राण हरण केले. पुतनेचा पापी देह पृथ्वीवर पडला आणि तिला गतजन्मात वामनावतारात घडलेल्या प्रसंगाचे स्मरण झाले. तेव्हा तिचा सात्त्विक लिंगदेह मुक्त होऊन कृष्णलोकात गेला.’
(सौजन्य : https://mahabharat18.quora.com/What-was-the-name-of-the-daughter-of-King-Bali )
टीप २- सुतललोक : ‘सप्त पाताळांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल. या सप्तपाताळांपैकी ‘सुतल’ या लोकाचे राज्य वामनाने बळीराजाला दिले.’
(सौजन्य : https://hi.quora.com/-पातालों-के-नाम-क्या-क्या-हैं)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०२४)