‘औक्षण करणे’ आणि ‘ओवाळणे’, यांसंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !

‘काही प्रसंगी ‘औक्षण करणे’ आणि काही प्रसंगी ‘ओवाळणे’, असे शब्दप्रयोग केले जातात. ‘त्यांत भेद काय आहे ? त्यांचे आध्यात्मिक लाभ कोणते ?’, या प्रश्नांची उत्तरे देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झाली. ती पुढे दिली आहेत.

‘औक्षण’ करतांनाचे प्रातिनिधिक छायाचित्र

१. औक्षण करणे

श्री. राम होनप

१ अ. ‘औक्षण’ या शब्दाचा अर्थ : ‘औक्ष’ हा शब्द आयुष्य, आरोग्य आणि मांगल्य यांच्याशी संबंधित आहे, तर ‘ण’ या शब्दाचे ‘अक्षय्य रहाणे’, ‘वृद्धी होणे’ किंवा ‘टिकून रहाणे’, असे अर्थ  आहेत. ‘औक्षण करणे’ हे व्यक्तीशी संबंधित आहे. ‘व्यक्तीला चांगले आरोग्य आणि आयुष्य प्राप्त होऊन ते वृद्धींगत व्हावे’, यासाठी केलेला धार्मिक विधी, म्हणजे ‘औक्षण’ होय.

१ आ. औक्षणाची प्रचलित असलेली कृती : वाढदिवस, विवाह, युद्धाला जाणे, युद्ध जिंकणे इत्यादी प्रसंगी व्यक्तीचे औक्षण केले जाते. यात प्रथम लाकडी पाटाभोवती रांगोळी काढली जाते आणि त्या पाटावर ज्या व्यक्तीचे औक्षण करायचे आहे, तिला बसवले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या कपाळावर औक्षणाच्या तबकातील कुंकू आणि अक्षता लावल्या जातात. नंतर सुवासिनी निरांजनाचे तबक हातांत घेऊन त्यातील अंगठी किंवा एखादा दागिना आणि सुपारी हातात घेऊन त्या व्यक्तीच्या चेहर्‍याभोवती ३ वेळा ओवाळते. सर्वांत शेवटी त्या व्यक्तीला औक्षणाच्या तबकाने ओवाळले जाते. या संपूर्ण क्रियेला ‘औक्षण करणे’, असे म्हणतात.

१ इ. ‘औक्षण करणे’, ही केवळ दिवा ओवाळण्याची एक क्रिया नसून तो एक धार्मिक विधी आहे.

१ ई. औक्षण केल्याने व्यक्तीला होणारे लाभ

१ ई १. शारीरिक : व्यक्तीच्या शरिरातील रोगजंतूंची शक्ती काही प्रमाणात न्यून होते किंवा ते नष्ट होतात. त्यामुळे तिला आरोग्य प्राप्त होते.

१ ई २. मानसिक : व्यक्तीतील रज-तम न्यून होते आणि तिच्यातील सत्त्वगुणात वृद्धी होते. त्यामुळे तिचे मन स्थिर, सकारात्मक आणि उत्साही होते.

१ ई ३. आध्यात्मिक 

अ. व्यक्तीच्या शरिरातील आणि शरिराच्या भोवती असलेले त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण न्यून होते.

आ. व्यक्तीच्या प्राणऊर्जेत वाढ होते. त्यामुळे तिला आयुष्य आणि आरोग्य प्राप्त होण्यास साहाय्य होते. या क्रियेला ‘प्राणाची बलपुष्टी’, असे म्हणतात.

अ १. ‘प्राणाची बलपुष्टी’ याचा अर्थ : जेव्हा व्यक्तीच्या प्राणशक्तीत वाढ होते, तेव्हा प्राणाचे ‘बळ’ वाढते. जेव्हा व्यक्तीची प्राणऊर्जा न्यून असते, तेव्हा औक्षणाने ‘प्राण’ सुदृढ होतो. तेथे ‘पुष्टी’, असा शब्दप्रयोग केला जातो. औक्षणाने व्यक्तीच्या प्राणाच्या संदर्भातील वरील दोन्ही कार्ये घडतात. त्यामुळे त्या क्रियेला ‘प्राणाची बलपुष्टी’, असे म्हणतात.

देवतेला ‘ओवाळतां’नाचे प्रातिनिधिक छायाचित्र

२. ओवाळणे 

२ अ. ‘ओवाळणे’ या शब्दाची निर्मिती : ‘ओवाळणे’ या शब्दाची निर्मिती ‘आळवणे’, या शब्दातून झाली आहे. प्राचीन काळात ‘भक्ताचे आळवणे’, हे भगवंताची मूर्ती किंवा गुरु यांना ओवाळण्याच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यातून ‘ओवाळणे’ ही उपासनेची पद्धत प्रचलित होऊ लागली. देव आणि गुरु यांना दिवा किंवा उदबत्ती यांद्वारे ओवाळता येते. ‘ओवाळणे’ या शब्दांतील प्रत्येक अक्षराचा अर्थ पुढे दिला आहे.

१. ओ : हा शब्द ईश्वरी शक्तीला अनुसरून आहे.

२. वा : हा शब्द ‘विनवणी’ किंवा ‘आळवणे’, या अर्थाने आहे.

३. ळ : हा शब्द ‘पूजन करणे’, या अर्थाने आहे. (टीप १)

४. णे : हा शब्द साधकाने भगवंत किंवा गुरु यांना ‘माझा स्वीकार करावा’, अशी केलेली याचना दर्शवतो.

टीप १ : ‘ओवाळणे’ या शब्दातील ‘ळ’चा ‘पूजन करणे’, असा अर्थ असण्यामागील कारण : साधक आर्तभावाने गुरु किंवा देव यांना ओवाळतो. त्या वेळी तो आर्तभावाने देवाला पूजतच असतो. त्यामुळे ओवाळण्याच्या सर्वसाधारण क्रियेतही ‘पूजना’चा समावेश केला आहे.

२ आ. ‘ओवाळणे’ हा एक धार्मिक विधी नसून ते उपासनेचे एक अंग आहे.

२ इ. ‘भगवंत किंवा गुरु यांना आळवणे किंवा त्यांचे पूजन करणे’, म्हणजे ‘ओवाळणे’ होय.

२ ई. कुणाला ओवाळावे ? : देवतांच्या मूर्ती, देहधारी संत किंवा देहत्याग केलेल्या संतांची छायाचित्रे यांना ओवाळावे.

२ ई १. देव किंवा गुरु यांना ओवाळण्यामागील कारण : हे उपासनेचे एक अंग आहे. देव किंवा गुरु हे सर्वशक्तीमान असतात. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे त्यांचे ‘औक्षण’ केले जात नाही.

२ ई २. काही प्राणी आणि वस्तू यांनाही ओवाळण्यामागील कारण : सनातन धर्मात गाय, बैल, नाग, हत्ती आणि शस्त्रे यांचे पूजन केले जाते. या सर्वांना देवस्वरूप मानले असल्याने त्यांनाही ओवाळले जाते. (या ओळीचे टंकलेखन पूर्ण झाल्यावर आश्रमाच्या बाहेरील परिसरात एक गाय मोठ्याने हंबरू लागली. त्या वेळी ‘या ज्ञानातील सूत्राला गायीने हंबरून प्रतिसाद दिला, म्हणजे तिच्या माध्यमातून देवानेच त्याला अनुमोदन दिले आहे’, असा विचार माझ्या मनात आला.)

२ उ. देवाची मूर्ती आणि गुरु यांना ओवाळण्याची पद्धत

२ उ १. देवाची मूर्ती किंवा चित्र यांना ओवाळण्याची पद्धत : आरतीच्या वेळी देवाची मूर्ती किंवा चित्र यांना आरती पूर्ण होईपर्यंत दिव्याने वर्तुळाकार ओवाळावे. अन्य वेळी साधक त्याच्या भावानुसार देवाला ३ वेळा दिव्याने वर्तुळाकार ओवाळण्याची कृती करू शकतो. साधक ही कृती दिवसातून कितीही वेळा करू शकतो; कारण तो त्याच्या उपासनेचा एक भाग आहे. त्यामुळे त्याला कुठलेही बंधन नाही.

२ उ २. संतांच्या योगमार्गांनुसार त्यांना ओवाळण्याच्या पद्धती

२ उ २ अ. शक्तीयोगी संत : काही संतांची शक्तीची उपासना असते. त्यांना ओवाळण्यापूर्वी त्यांच्या कपाळाला कुंकू आणि अक्षता लावाव्यात. अशा संतांच्या देहातून शक्तीचे प्रक्षेपण मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे त्यांच्या समोर ओवाळण्यासाठी उभे रहाताच त्या साधकातील अग्नितत्त्व जागृत होते. या प्रक्रियेमुळे संतांना दिव्याने एकदा ओवाळले, तरीही साधकाला त्या संतांची शक्ती सहन करणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे अशा संतांना दिव्याने एकदाच वर्तुळाकार भावपूर्ण ओवाळावे.

२ उ २ आ. ‘कर्म’, ‘ज्ञान’ आणि ‘भक्ती’, या योगमार्गांतील संत : ‘कर्म’, ‘ज्ञान’ आणि ‘भक्ती’, या योगमार्गांतील संतांना ओवाळतांना परंपरेनुसार त्यांच्या कपाळाला कुंकू आणि अक्षता लावाव्यात. संत ज्या ठिकाणी बसलेले असतात, ती जागा मंगलच असते. त्यामुळे ओवाळण्यापूर्वी त्यांना लाकडी पाटावर बसवून पाटाभोवती रांगोळी काढण्याची आवश्यकता नाही. संत ज्या ठिकाणी बसले आहेत, त्याच ठिकाणी त्यांना ३ वेळा दिव्याने वर्तुळाकार भावपूर्ण ओवाळावे.

२ उ २ इ. संन्यासी आणि उच्च आध्यात्मिक पातळी असलेले संत : संन्यासी जीवन जगणारे संत, उदा. समर्थ रामदासस्वामी किंवा उच्च आध्यात्मिक पातळी असलेले संत यांची साधना निर्गुणाशी संबंधित असते. कुंकू आणि अक्षता सगुणाशी संबंधित आहेत. त्यामुळे अशा संतांच्या कपाळाला कुंकू आणि अक्षता लावण्याची आवश्यकता नाही. त्यांना केवळ दिव्याने तीनदा वर्तुळाकार भावपूर्ण ओवाळावे.

२ उ २ ई. देव आणि संत यांना दिव्याने ३ वेळा ओवाळण्यामागील कारण : देव आणि संत यांना ओवाळण्यास आरंभ केल्यावर त्यांच्याकडून ओवाळणार्‍या साधकाच्या दिशेने चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. त्यामुळे संतांना पहिल्यांदा ओवळतांना साधकाच्या शरिरातील रज-तम दूर होऊन त्याची शुद्धी होण्यास साहाय्य होते. दुसर्‍यांदा ओवाळतांना संतांचे चैतन्य साधकाच्या मनापर्यंत पोचते आणि तिसर्‍यांदा ओवाळतांना साधकाच्या चित्ताभोवतीचे मायेचे आवरण चैतन्याने न्यून होते. या सर्वांचा परिणाम; म्हणून संतांकडून प्रक्षेपित होत असलेले चैतन्य साधकाच्या आत्म्यापर्यंत पोचते. तेव्हा साधकाला आनंदाची अनुभूती येते. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी साधकाने देव आणि संत यांना दिव्याने ३ वेळा वर्तुळाकार आणि भावपूर्ण ओवाळणे महत्त्वाचे आहे.

२ उ २ उ. देव आणि संत यांना दिव्याने वर्तुळाकार ओवाळण्यामागील कारण : वर्तुळाचा आकार ‘पूर्ण’ आणि ‘अखंड’ असतो. त्याप्रमाणे देव आणि संत ‘पूर्ण’ किंवा सर्वार्थांनी ‘परिपूर्ण’ असतात. साधकाने देवाची मूर्ती आणि संत यांना दिव्याने वर्तुळाकार ओवाळल्याने त्याला चैतन्याचा लाभ अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे त्यांना वर्तुळाकारात ओवाळले जाते; याउलट साधकाने देव आणि संत यांना अर्धवर्तुळाकार ओवाळल्यास त्याला चैतन्याचा फारसा लाभ होत नाही.

२ उ २ ऊ. ओवाळण्यासाठी ‘स्त्री’ किंवा ‘पुरुष’ असण्याचे बंधन नसणे : देवाची मूर्ती किंवा चित्र यांना स्त्री किंवा पुरुष कुणीही ओवाळू शकते. परंपरेनुसार संतांना सुवासिनी स्त्री ओवाळते; परंतु सत्शिष्य, म्हणजे उत्तम शिष्य हा पुरुष असला, तरी तो साधनेमुळे संत किंवा गुरु यांना ओवाळण्यास पात्र असतो.

२ ऊ. ओवाळण्याचे प्रकार

२ ऊ १. मौनारती : सत्ययुगात देव किंवा गुरु यांना ३ वेळा दिव्याने ओवाळले जात असे. ही क्रिया निःशब्द असे. त्यामुळे तिला ‘मौनारती’, असे म्हणतात.

२ ऊ २. मंत्रारती : त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये देवाची मूर्ती किंवा गुरु यांना दिव्याने ओवाळतांना त्याला मंत्रांची जोड दिली जात असे. हे मंत्र प्रामुख्याने सूर्याशी संबंधित असत. त्या काळी सूर्याला पृथ्वीचा ‘प्रधान देव’ मानला जात असे. जे लोक सूर्याला पृथ्वीचा ‘प्रधान देव’ मानत असत, त्यांना ‘गायत्री-उपासक’ किंवा ‘सूर्य-उपासक’, असे म्हटले जात असे. त्यांना ‘कर्तृगामी’, असेही म्हणतात.

२ ऊ २ अ. ‘कर्तृगामी’ या शब्दाचा अर्थ : ‘कर्तृ’ हा शब्द कर्ता, म्हणजे सूर्याला उद्देशून आहे. ‘गामी’ या शब्दाचा अर्थ ‘त्या मार्गाने जाणारे’, असा आहे. सूर्य-उपासनेच्या मार्गाने जाणार्‍या भक्तांना ‘कर्तृगामी’, असे म्हणतात. त्यातून ‘सूर्यवंशी’ हा शब्दप्रयोग प्रचलित झाला.

२ ऊ ३. आरती : कलियुगात साधकांना देव किंवा गुरु यांना दिव्याने ओवाळतांना मौन रहाणे किंवा मंत्र म्हणणे कठीण जाऊ लागले. त्यामुळे काही संतांनी देवता आणि गुरु यांचे गुणवर्णन करणार्‍या आरत्यांची रचना केली अन् त्यांना गायनाचे स्वरूप दिले. त्यामुळे साधकांना देव किंवा गुरु यांना आळवणे सुलभ जाऊ लागले.

२ ए. ओवाळल्याने होणारे लाभ

१. देव किंवा गुरु यांना ओवाळल्याने साधकाच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम किंवा आत्मीयता उत्पन्न होण्यास साहाय्य होते.

२. देव किंवा गुरु यांना आदरयुक्त आणि प्रेमाने ओवाळल्याने ते त्या साधकावर प्रसन्न होतात.

३. देव किंवा गुरु यांची साधकावर कृपा होते.

३. ‘औक्षण करणे’ आणि ‘ओवाळणे’ यांतील भेद

अ. ज्या व्यक्तीचे औक्षण केले जाते, तिला त्या विधीचा आध्यात्मिक लाभ होतो; याउलट संत किंवा गुरु यांना ओवाळणार्‍या साधकाला ओवाळण्याच्या कृतीचा लाभ होतो.

आ. औक्षणातील प्रत्येक कृतीला विशिष्ट महत्त्व आहे. यात ‘कर्म’ महत्त्वाचे आहे, तर ओवाळण्याच्या क्रियेत ‘भाव’ या घटकाला महत्त्व आहे.

इ. ‘औक्षण करणे’ हा एक धार्मिक विधी आहे, तर ‘ओवाळणे’ ही उपासनेची एक पद्धत आहे.

ई. औक्षण ‘विवाह, वाढदिवस, युद्धाला जाणे’ इत्यादी विशिष्ट प्रसंगी केले जाते, तर ओवाळणे ही क्रिया साधकाला प्रतिदिन करता येते.

४. ‘औक्षण करणे आणि ओवाळणे’ यांविषयी सूक्ष्मातील ज्ञान मिळवतांना आलेली अनुभूती

२५.७.२०२३ या दिवशी मला देवाच्या कृपेमुळे ‘औक्षण’ आणि ‘ओवाळणे’ या शब्दांच्या संदर्भात सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त झाले. मी त्याचे भ्रमणसंगणकावर (लॅपटॉपवर) टंकलेखन केले. ते पूर्ण झाल्यावर भ्रमणसंगणक बंद करून मी भोजनासाठी भोजनकक्षात गेलो. थोड्या वेळाने मी वरील विषयाच्या लिखाणाचे संकलन करण्यासाठी भ्रमणसंगणक चालू केला. तेव्हा तो चालू होत नव्हता. मी तो दुरुस्तीसाठी संबंधित साधकाकडे दिला. ‘हा भ्रमणसंगणक कधी दुरुस्त होईल ? ती ज्ञानाची धारिका परत मिळेल कि नाही ?’, हे मला ठाऊक नव्हते. त्यामुळे ‘आता भ्रमणसंगणक दुरुस्त होण्याची वाट न पहाता या ज्ञानाचे परत टंकलेखन करावे’, असा विचार माझ्या मनात आला आणि देवाच्या कृपेमुळे मला हे ज्ञान सूक्ष्मातून परत प्राप्त झाले, तसेच याविषयी आणखी ज्ञान नव्याने मिळाले.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.७.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.