|
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘वर्ष २०१८ मध्ये नालासोपारा येथील गोरक्षक वैभव राऊत यांच्याविषयी ‘वैभव राऊत हे मराठा मोर्चामध्ये बाँब फोडणार होते’, असे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. याविषयी पोलीस यंत्रणांच्या अन्वेषणात काहीही निष्पन्न झाले नसतांना किंवा आरोपपत्रात असे नमूद नसतांना आव्हाड यांनी असे वक्तव्य केले होते. त्याविरोधात ‘हिंदु टास्क फोर्स’चे अध्यक्ष अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्याविरुद्ध केलेली तक्रार नोंदवण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी ठाणे येथील कनिष्ठ न्यायालयात याचिका केली होती. ठाणे येथील न्यायालयाने ही याचिका फेटाळली. यावर अधिवक्ता खंडेलवाल यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली, तेव्हा यावर उच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेण्याचा आदेश ठाणे येथील कनिष्ठ न्यायालयाला दिला.
अधिवक्ता खुश खंडलेवाल कनिष्ठ न्यायालयात गेले, तेव्हा आव्हाड यांचे हे वक्तव्य एक अपराध असल्याचे मान्य केले होते; मात्र क्षेत्राधिकाराच्या आधारावर न्यायालयाने फौजदारी तक्रार नोंदवण्यास नकार दिला होता.
वर्ष २०१८ मध्ये आतंकवादविरोधी पथकाने गोरक्षक वैभव राऊत यांना बाँबस्फोट प्रकरणात अटक केली होती; तेव्हा यावर आव्हाड यांनी राजकीय लाभ उठवण्यासाठी वरील वक्तव्य केले असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.