राज्यातील गोशाळांना १७ कोटी २१ लाख रुपयांचे अनुदान वितरित !

‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची माहिती

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – राज्यातील गोसंवर्धन गोवंश केंद्र योजनेच्या अंतर्गत वर्ष २०२३-२४ मध्ये ३४ जिल्ह्यांतील ३२४ तालुक्यांतील पात्र १३५ गोशाळांना १७ कोटी २१ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.

देशी गोवंशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्यशासनाने आयोगाची स्थापन केली आहे. गोशाळांनी दुग्धोत्पादनास, शेती कामास, पशूपैदास, ओझी वहाण्याच्या कामास उपयुक्त असलेल्या-नसलेल्या गाय, वळू, बैल आणि वय झालेल्या गोवंशियांचे संगोपन करण्याकरता चारा, पाणी आणि निवारा यांची व्यवस्था करण्यासाठी हे अनुदान वितरित करण्यात आले आहे. मागील एका वर्षांपासून गोशाळाचालकांना या अनुदानाची प्रतिक्षा होती.