BJP protests : राहुल गांधी यांच्‍या निवासस्‍थानाच्‍या बाहेर भाजपची निदर्शने

‘शीख भारतात भयग्रस्‍त आहेत’, या गांधी यांच्‍या विधानावर आक्षेप

नवी देहली – भाजपच्‍या(BJP) शीख सेलमधील शीख कार्यकर्त्‍यांनी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्‍या शहरातील(Delhi) निवासस्‍थानाच्‍या बाहेर निदर्शने केली. राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारत आणि शीख यांचा अवमान केला, असे त्‍यांचे म्‍हणणे होते. ‘विदेशात आपल्‍या देशाची अपकीर्ती झाली आहे. याविषयी त्‍यांनी क्षमा मागितली पाहिजे’, असे त्‍यांचे म्‍हणणे होते. पोलिसांनी भाजपचे नेते आर्.पी. सिंह आणि अन्‍य शीख नेते यांना कह्यात घेतले आहे.

काय म्‍हणाले होते राहुल गांधी ?

राहुल गांधी अमेरिकेच्‍या दौर्‍यावर असतांना त्‍यांनी, ‘भारतातील शीख समुदायामध्‍ये, ‘आम्‍हाला पगडी आणि कडे घालण्‍याची अनुमती दिली जाईल की नाही?’, तसेच ‘आम्‍हाला गुरुद्वारात जायला मिळेल का ?’, यांविषयी भीती आहे. ही केवळ शिखांसाठीच नाही, तर सर्व धर्मियांसाठी चिंतेची बाब आहे’, असे म्‍हटले होते. ‘शीखविरोधी वक्‍तव्‍य करणारे गांधी यांना न्‍यायालयात खेचणार’, असेही भाजपच्‍या शीख नेत्‍यांनी सांगितले.

गांधी कुटुंब सत्तेत असतांनाच शिखांना भीती ! – भाजप

भाजपचे नेते हरदीप सिंह पुरी म्‍हणाले, ‘‘वर्ष १९८४ मध्‍ये सुनियोजित कट रचून शिखांची हत्‍या करण्‍यात आली. यात काँग्रेसचे अनेक वरिष्‍ठ नेते सहभागी होते. या आक्रमणामध्‍ये ३ सहस्रांहून अधिक शीख मारले गेले. ही चूक मान्‍य करण्‍याऐवजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी इतरांवरच प्रश्‍न उपस्‍थित करत आहेत. राहुल गांधी यांचे कुटुंब सत्तेत असतांनाच भारतात शिखांना भीती वाटत होती. मी ६ दशकांपासून पगडी घालत आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसने १९८४ मध्‍ये शिखांचे हत्‍याकांड घडवून आणले. अशांनी ‘भारता शीख भयग्रस्‍त आहेत’, असे म्‍हणणे म्‍हणजे चोराच्‍या उलट्या बोंबा होय !