‘तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे – जगण्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हे तर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे) हा शाश्वत धर्म जगाला देण्यासाठी आपल्या राष्ट्राची निर्मिती झाली आहे. सत्ययुगापासून स्वातंत्र्यलढ्यापर्यंत धर्म हीच आपली शाश्वत प्रेरणा राहिली आहे. यालाच ‘हिंदु प्रेरणा’ म्हटले जाते. हिंदु म्हणजे मुसलमानांना विरोध नाही, तर सर्व समाजाचे रूप दर्शवणारे विशेषण आहे. सर्व विविधतांना स्वीकारणारा तो उदात्त भाव म्हणजे हिंदु आहे, असे उद्गार सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत यांनी काढले. ते ९ सप्टेंबर या दिवशी ‘साप्ताहिक विवेक’ आणि ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ यांच्या वतीने डॉ. मिलिंद पराडकर लिखित ‘तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभी बोलत होते.
प.पू. डॉ. मोहन भागवत म्हणाले,
१. धर्म म्हणजे पूजा नाही. सत्य, करुणा, शुचिता आणि तपस्या यांतून धर्माची मूल्ये पुढे आली आहेत. त्यामुळे ‘हे खा’, ‘ते खा’ किंवा ‘ते खाऊ नका’, ‘शिवू नका’, हे सांगणे म्हणजे धर्म नाही.
२. हिंदु धर्म हे नाव नाही, तर एका विचाराने जगणारे आणि सर्वाना स्वीकारणारे ते एक उदात्त विशेषण आहे.
३. धर्मप्राय देशाचा धागा एकतेचा आहे. सत्यातून येणारा हिंदु धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे. हिंदु हा गौरव आहे; मात्र सहस्रो वाटांनी त्यावर अतिक्रमण होत आहे. ते आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा विविध सूत्रांचे असून ते देशासाठी घातक आहे.
४. इस्लामी आक्रमणाचे स्वरूप लक्षात न आल्याने अनेक दैदीप्यमान संघर्ष विफल झाले. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘हिंदवी स्वराज्य’ हा उपाय लागू पडला. त्यांचीच प्रेरणा घेऊन राजस्थानमध्ये भारत दुर्गादास राठोड, छत्रसाल अशा अनेकांनी संघर्ष केला. अगदी इंग्रजांविरोधातील लढ्यातही छत्रपती शिवाजी महाराज हीच प्रेरणा होती.