भारतात प्रथमच सोलापूर येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज कथा ! – राजगोपाल मिणीयार

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज करणार उद्बोधन !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

सोलापूर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ७ दिवसांच्या कथेचे मराठीतून आयोजन समस्त हिंदु समाजाच्या वतीने भारतात प्रथमच सोलापूर येथे होत आहे. ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. गोविंददेव गिरि महाराज १९ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रतिदिन दुपारी ४ ते रात्री ७.३० या कालावधीत जुनी मिल कंपाऊंड येथील ‘नागेश करजगी ऑर्किड स्कूल’ येथे सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे सल्लागार समिती सदस्य आणि प्रसिद्ध लेखापरीक्षक श्री. राजगोपाल मिणीयार यांनी १० सप्टेंबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदे दिली. या प्रसंगी हेमंत पिंगळे, संगीता जाधव, सतीश सिरसिल्ला, आकाश शिरते उपस्थित होते.

१. शेकडो वर्षे अत्याचाराने ग्रासलेला आणि गुलामगिरीत अडकलेला हिंदु समाज छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून मुक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांची महती आजवर अनेक व्याख्याने, नाटक, चित्रपट, पोवाडे अशा अनेक माध्यमांतून गायली गेली आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याची माहिती कथारूपाने मराठी भाषेत सांगण्याची ही पहिलीच वेळ आहे.

२. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून ही कथा ऐकण्याची सुवर्णसंधी सोलापूरकरांसह महाराष्ट्रातील शिवभक्तांना मिळणार आहे. छत्रपती शिवरायांचा जन्म, शिव संस्कार, शिवप्रताप, शिवधैर्य, शिवशौर्य, शिवचातुर्य आणि शिवविजय या ७ विषयांवर ७ दिवस श्री शिवचरित्रातील विविध प्रसंग प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज   शिवभक्तांसमोर मांडणार आहेत. तरी सोलापूर शहर जिल्ह्यासह सर्व शिवभक्तांनी या कथेस दररोज उपस्थित राहून श्री शिवचरित्र कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देतांना राजगोपाल मिणीयार (डावीकडून तिसरे), तसेच अन्य मान्यवर

१९ सप्टेंबरला सोलापूर शहरात भव्य शोभायात्रा !

या कथेच्या निमित्ताने गुरुवार, १९ सप्टेंबरला दुपारी १ वाजता समस्त हिंदु समाजाच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौकमार्गे जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथे विसर्जित होणार आहे. या शोभायात्रेत शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटना, महिला मंडळे आपल्या कला पथकांसह सहभागी होणार आहेत. शोभायात्रा कथेच्या ठिकाणी आल्यानंतर प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज शिवभक्तांना पहिला भाग सांगणार आहेत. सोलापूरकरांनी या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. हेमंत पिंगळे यांनी केले.