गोव्यात ख्रिस्ती अल्प झाले; मात्र मुसलमानांची लोकसंख्या वाढली ! – राज्यपाल श्रीधरन् पिल्लई

राज्यपाल श्रीधरन् पिल्लई

पणजी, ९ सप्टेंबर (वार्ता.) – केरळच्या कोची येथील एका चर्चमधील कार्यक्रमात गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी गोव्यात ख्रिस्ती अल्प झाले आहेत, तर मुसलमानांची लोकसंख्या वाढली आहे, असे विधान केले होते. गोव्यातील ख्रिस्त्यांची लोकसंख्या पूर्वी ३६ टक्के होती, ती आता २५ टक्क्यांवर आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी एका ज्येष्ठ फादरचा हवाला देत म्हटले की, कॅथॉलिक समुदायाच्या लोकांची टक्केवारी ही २५ टक्के अल्प झाली आहे, तर मुसलमान समुदायातील लोकांच्या टक्केवारीत पूर्वीच्या ३ टक्क्यांवरून १२ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०११ मध्ये गोव्याची लोकसंख्या अंदाजे १६ लाख होती. त्यांच्या या वक्तव्यावर समाज माध्यमांतून टीकाही करण्यात आली. नंतर दुसर्‍या कार्यक्रमात त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण देतांना पिल्लई यांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले आहे. मी लोकसंख्या किंवा कोणत्याही विशिष्ट समुदायाबद्दल बोललो नाही. मला केवळ प्रतिभा पलायनाची (ब्रेन ड्रेन) संख्या दाखवायची होती. जेव्हा फादर, तसेच समाजाचे इतर नेते मला भेटले, तेव्हा मी प्रतिभा पलायनाच्या संदर्भातील काही बातम्यांचा उल्लेख केला. हे का होत असावे, यांचा अभ्यास करण्याचा सल्लाही मी त्यांना दिला, असे पिल्लई यांनी म्हटले. गोव्यातील ख्रिस्ती समुदायातील अनेकांनी नोकरी आणि व्यवसाय यांच्या नव्या संधीच्या शोधात अन्यत्र स्थलांतर केले आहे, असेही ते या वेळी म्हणाले.

काय आहे ‘ब्रेन ड्रेन’ किंवा प्रतिभा पलायन ?

एखाद्या व्यक्तीकडे प्रतिभा असूनही त्यास योग्य साधनसुविधा किंवा संधी न मिळाल्याने त्याने संधीच्या शोधात दुसरीकडे केलेले स्थलांतर यास अर्थशास्त्रानुसार ‘ब्रेन ड्रेन’ किंवा प्रतिभा पलायन, असे म्हणतात.

संपादकीय भूमिका 

  • नुकतीच हिंदू महारक्षा आघाडीचे नेते प्रा. सुभाष वेलींगकर यांनी गोव्यातील मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येविषयी एका कार्यक्रमात हिंदूंना सजग केले होते. हे सर्व मुसलमान परराज्यांतून गोव्यात येऊन स्थायिक झाले आहेत. त्यांचा मुलींना पळवणे आणि इतर गुन्हे यांतील सहभाग वाढला आहे. काहींचा आतंकवाद्यांशी निगडित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया याच्याशीही संबंध आहे.
  • गोव्यातील पूर्वीचे स्थानिक मुसलमान येथील अन्य धर्मियांशी धार्मिक सलोखा राखून आहेत; पण परराज्यांतील मुसलमानांनी येथे येऊन शांतताप्रिय आणि धार्मिक सलोखा असलेल्या गोव्यातील वातावरण गढूळ केले आहे.