महिलांनी मद्याचे दुकान पेटवले !
यवतमाळ – मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथील बस थांब्याजवळ चालू असलेले देशी, विदेशी मद्याचे अवैध दुकान गावातील महिलांनी पेटवून दिले. पोलीस आणि ग्रामपंचायत येथे वारंवार विनंती करूनही या दुकानावर कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी या दुकानात शिरून तेथील मद्य आणि इतर साहित्य पेटवून दिले. (असे पोलीस आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे ! – संपादक)
मोटारीच्या धडकेने तरुणाचा मृत्यू !
पुणे – नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात भरधाव मोटारीने वळण घेत असलेल्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये सुधांशु राज या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार तरुण घायाळ झाला. या प्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक !
डोंबिवली – शेअर मधील गुंतवणुकीच्या माध्यमातून वाढीव परतावा देण्याचे आमीष दाखवून ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून डोंबिवलीतील अमित विठ्ठल भावे या व्यावसायिकाची ३ भामट्यांनी ५६ लाख ६४ सहस्र रुपयांची फसवणूक केली आहे. मे ते सप्टेंबर या ५ महिन्यांच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
इंदापूर येथे ९ सुतळी बाँब, पिस्तुले यांसह दरोडेखोराला अटक !
इंदापूर (पुणे) – इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी सुयश उपाख्य तात्या सोमनाथ या दरोडेखोराला ९ सुतळी बाँब, ३ पिस्तूल, तलवारी आणि कोयते यांसह अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
पुणे येथे गुंतवणुकीच्या आमिषाने १२१ जणांची फसवणूक !
पुणे – गुंतवणुकीच्या आमिषाने १२१ जणांची ९ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी भालचंद्र अष्टेकर यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. विजयकुमार घाटे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. आरोपी अष्टेकर यांनी ‘साई इंड्स मार्केटिंग’ आणि ‘मल्टी सर्व्हिसेस’ या नावांनी व्यवसाय चालू केला. गुंतवणुकीवर ४ ते १५ टक्के व्याज देण्याचे आमीष दाखवले. काही जणांना प्रारंभी परतावा दिला. त्यामुळे अनेकांनी पैसे गुंतवले; परंतु अष्टेकर यांनी कार्यालय बंद केल्याचे पाहून स्वत:ची फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांना समजले. गुन्ह्याची व्याप्ती विचारात घेऊन हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे अन्वेषणासाठी दिला आहे.