महाराष्ट्रात राबवले जात आहे ७ वर्षांपूर्वीचे क्रीडा धोरण !

मुंबई, ७ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यांचे क्रीडा धोरण दर ५ वर्षांनी निश्चित करून त्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. महाराष्ट्रात मात्र २०१२-२०१७ या पंचवार्षिक क्रीडा धोरणानंतर नवीन क्रीडा धोरण निश्चितच करण्यात आलेले नाही. या जुन्या धोरणावरच क्रीडा धोरणाचा कारभार चालू आहे. यातून राज्याची क्रीडाक्षेत्राविषयीची अनास्था दिसून येत आहे.

भारतात महाराष्ट्र राज्याने वर्ष १९९६-२००१ मध्ये पहिले पंचवार्षिक क्रीडा धोरण स्वतंत्रपणे निश्चित केले. त्यानंतर देशातील विविध राज्यांनी महाराष्ट्राचे अनुकरण करत स्वत:ची स्वतंत्र क्रीडा धोरणे निश्चित केली. काळानुरूप विविध राज्यांनी त्यांच्या क्रीडा धोरणांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या आहेत. सद्यःस्थितीत उत्तरप्रदेशमध्ये २०२३-२८ मध्ये, राज्यस्थान – वर्ष २०२४-२९, आसाम – २०२३-२८, उत्तराखंड २०२१-२६, गुजरात २०२२-२७, केरळ २०२३-२८ अशी क्रीडा धोरणे कार्यरत आहेत. महाराष्ट्रात मात्र २०१७ नंतर क्रीडा धोरण निश्चितच करण्यात आलेले नाही.