देशाच्‍या एकूण गुंतवणुकीत गेली २ वर्षे महाराष्‍ट्र क्रमांक १ वर ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

देशातील एकूण गुंतवणुकीच्‍या ५२.४६ टक्‍के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्‍ट्रात

देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

मुंबई – २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्‍या पहिल्‍या तिमाहीतही महाराष्‍ट्रात सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. महाराष्‍ट्र गेली २ वर्षे सातत्‍याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्‍यात देशात प्रथम क्रमांकावर आहे.

एप्रिल ते जून या पहिल्‍या तिमाहीत राज्‍यात एकूण ७० सहस्र ७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्‍स या सामाजिक माध्‍यमावर पोस्‍ट करून दिली आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्‍या ५२.४६ टक्‍के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्‍ट्रात आहे, असे त्‍यांनी यात म्‍हटले आहे.

अडीच वर्षांत ५ वर्षांचे काम !

राज्‍यात २०१४ ते २०१९ या काळात सत्तेत असतांना एकूण ३ लाख ६२ सहस्र १६१ कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्‍ट्रात आली होती. ‘अडीच वर्षांत आम्‍ही ५ वर्षांचे काम करून दाखवू’, हे पहिल्‍याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्‍वा दोन वर्षांत ३ लाख १४ सहस्र ३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक आम्‍ही आणून दाखवली, असेही फडणवीस यांनी पुढे म्‍हटले आहे.

काँग्रेसची टीका

या संदर्भात टीका करतांना काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष विजय वडेट्टीवार यांनी म्‍हटले आहे की, केंद्राच्‍या आर्थिक अहलवालात महाराष्‍ट्र गुजरातच्‍या मागे आहे. त्‍यामुळे फडणवीस यांचा दावा बोगस आहे.

वरील टीकेला प्रत्‍युत्तर देतांना ‘वडेट्टीवार यांनी अर्थमंत्री म्‍हणून काम केले नाही. त्‍यांना या संदर्भातील कळणार नाही’, असे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्‍हटले आहे.