गणेशोत्सवात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या संकल्पना राबवू नयेत !

हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

जयसिंगपूर नगर परिषद (जिल्हा कोल्हापूर) येथे बांधकाम अभियंता रामचंद्र एकनाथ कुंभार (डावीकडून चौथे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

निपाणी (कर्नाटक), ४ सप्टेंबर (वार्ता.) – वर्ष २०२० मध्ये निपाणी नगरपालिकेने मूर्तीदान प्रकल्प राबवून जमा झालेल्या श्री गणेशाच्या मूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेऊन कचरा डेपोमध्ये ठेवल्या होत्या. यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने निपाणी येथील भाविकांनी मूर्तीदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देणे बंद केले आहे. याच समवेत निपाणी शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न होता सरळ नैसर्गिक जलस्रोतामध्ये जाऊन मिसळते. त्यामुळे वर्षातून एक दिवस केलेल्या श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे पाणी प्रदूषण होते असे म्हणणे, हे हास्यास्पद आहे. तरी येणार्‍या गणेशोत्सवात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या संकल्पना राबवू नयेत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी तहसीलदार प्रवीण कारंडे यांना देण्यात आले.

निपाणी (कर्नाटक) येथे तहसीलदार प्रवीण कारंडे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

या प्रसंगी श्रीराम सेना कर्नाटकचे श्री. अमोल चेंडके, बजरंग दलाचे श्री. अजित पारळे, हिंदुत्वनिष्ठ श्री. अभिनंदन भोसले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल बुडके, ‘सद्गुरु त्वायक्वांदो ॲकॅडमी’चे श्री. बबन निर्मळे, सर्वश्री रवींद्र शिंदे, दिलीप काळभर, प्रशांत घोडके, अक्षय वाघेला यांसह अन्य उपस्थित होते.

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – याच मागणीचे निवेदन जयसिंगपूर नगर परिषद येथे दिले. हे निवेदन मुख्याधिकार्‍यांच्या वतीने बांधकाम अभियंता रामचंद्र एकनाथ कुंभार यांनी स्वीकारले. या प्रसंगी भाजपचे श्री. राजेंद्र दाईंगडे, श्री. सुनील ताडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. भगवंत जांभळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. संजय घाटगे आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. नारायण शिंदे उपस्थित होते.