|
पणजी, २९ ऑगस्ट (वार्ता.) – ‘अल शदाई चॅरिटेबल ट्रस्ट’च्या आसगाव येथील ‘कॅथलिन हाऊस’मध्ये कोणतीही अनुमती न घेता आणि कागदोपत्री व्यवहार न करता अल्पवयीन मुलांना आसरा देण्यात आला आहे. याविषयी उत्तर गोवा बाल कल्याण समितीने हणजूण पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गंभीर नोंद घेऊन याविषयी स्वेच्छा जनहित याचिका प्रविष्ट करून
घेतली आहे.
या प्रकरणी २८ ऑगस्ट या दिवशी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर गोवा बाल कल्याण समिती आणि जिल्हा बाल संरक्षण विभाग यांनी २८ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३.३० वाजता ‘अल शदाई चॅरिटेबल ट्रस्ट’च्या आसगाव येथील ‘कॅथलिन हाऊस’ची तपासणी केली. यासंबंधी तपासणी अहवाल ३० ऑगस्ट या दिवशी उच्च न्यायालयाला देण्यात येणार आहे. उच्च न्यायालयात याविषयी ३० ऑगस्ट या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.
हणजूण पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत बाल कल्याण समितीने पुढील गंभीर सूत्रे नोंद केली आहेत.
१. कायद्यानुसार कोणत्याही आसरागृहात अल्पवयीन मुलांना ठेवून घ्यायचे असल्यास त्यासंबंधीची माहिती बाल कल्याण समितीला देणे सक्तीचे आहे: मात्र ‘अल शदाई’च्या वतीने अशी कोणतीच माहिती दिली जात नाही आणि अनुमतीही घेतली जात नाही.
२. बाल कल्याण समितीने या ठिकाणी जेव्हा आकस्मिक धाड टाकली, तेव्हा त्या ठिकाणी २ ते १० वर्षे वयोगटातील ३४ हून अधिक मुले आढळली. ‘अल शदाई’ ट्रस्टला ‘कॅथलिन हाऊस’मधील मुले आणि त्यांचे पालक यांच्यासह समितीच्या समोर उपस्थित करण्यास सांगण्यात आले होते, तरही ट्रस्टने यासंबंधी कोणतीही कार्यवाही केली नाही. तेथे असलेल्या मुलांची अवस्था बिकट होती. या ठिकाणी असलेली मुले कुठली आहेत आणि त्यांना अनुमती घेतल्याविना आसरागृहात का ठेवले आहे ? याविषयी बाल कल्याण समितीने चिंता व्यक्त केली.
३. हणजूण पोलिसांनी या प्रकरणी ‘अल शदाई’ ट्रस्टच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.