भगवान श्रीकृष्णाच्या संदर्भात ‘कृष्णं वन्दे जगद्गुरुम्’ असे म्हटलेले आहे. सर्व देवतांमध्ये फक्त श्रीकृष्णालाच ‘जगद्गुरु’ ही उपाधी आहे. ते सर्व विश्वाचे, म्हणजेच सर्व मानवजातीचे मार्गदर्शक आहेत. अशा भगवंताचा आषाढ कृष्ण अष्टमीला रात्री १२ वाजता कंसाच्या कारागृहात जन्म झाला. २६ ऑगस्ट या दिवशी कृष्ण जन्माष्टमी झाली. त्या निमित्ताने त्याचे महान अवतारी कार्य समजून घेऊन त्याचे आचरण करण्याची संधी घेणे महत्त्वाचे आहे. केवळ दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम करून भागणार नाही.
अशा पूर्णावतारी भगवंताने बालपणापासूनच लीला केलेली आहे. श्रीकृष्णाने त्याच्या आईला ‘तो पूर्णावतार आहे’, याची चुणूक दाखवली होती. लहानपणी माती खाल्ली; म्हणून यशोदामातेने त्याला तोंड उघडण्यास सांगितले. तेव्हा तिला त्याने तोंड उघडून ‘विश्वरूप’ दाखवले. त्यामुळे त्याच्या आईला कृष्ण ‘भगवंत’ आहे, हे लक्षात आले ! इंद्राने मोठी पर्जन्यवृष्टी चालू केली. त्या वेळी श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला आणि गोपगोपींचे रक्षण केले; परंतु त्या वेळी गोपगोपींनीही गोवर्धन पर्वताला त्यांच्या काठ्या लावल्या. खरेतर श्रीकृष्णाच्या करंगळीचे टोकच गोवर्धन पर्वत उचलण्यास पुरेसे होते; पण गोपगोपींनी त्याला साहाय्य करणे, ही त्यांची साधना होती. हे श्रीकृष्णाने त्याच्या लीलेतून शिकवले. आताही धर्मसंस्थापनेच्या कार्यात प्रत्येकाने देवाची भक्ती करत त्याचे योगदान दिले पाहिजे.
कौरव-पांडवांच्या युद्धात भगवंताने एक युक्ती केली. एका बाजूने १८ औक्षहणी सैन्य, तर दुसर्या बाजूने कृष्ण असणार, तोही नि:शस्त्र. कुणाला काय पाहिजे, ते मागायला सांगितले. कौरवांना वाटले ‘नि:शस्त्र श्रीकृष्ण काय कामाचा ?’ त्यांना ‘सैन्य हवे’, असे त्यांनी सांगितले; परंतु पांडवांनी भगवान श्रीकृष्णाला ‘त्यांच्या बाजूने रहा’, असे सांगितले. ‘ज्या बाजूने भगवंत असतो, तिथे विजय हा निश्चित असतो आणि ज्या बाजूने भगवंत नसतो, तिथे पराजय हा ठरलेला असतो’, हे सत्य श्रीकृष्णाने ही मोठी लीला करून सिद्ध केलेले आहे ! महाभारत युद्धातच अर्जुनाला निमित्त करून सार्या मानवजातीला गीतेच्या रूपात महान तत्त्वज्ञान उपलब्ध करून दिले. धनंजय अर्जुनाला विश्वरूप दाखवून शेवटी ‘तू युद्ध कर’, असे ठणकावून सांगितले. अशा या भगवान श्रीकृष्णाने भक्तांसाठी वचन दिले, ‘माझ्या भक्तांचा कुणीही नाश करू शकत नाही. मी फक्त माझ्या भक्तांचेच रक्षण करतो, दुर्जनांचे नाही.’ नुसत्या सज्जनांचे दायित्व श्रीकृष्ण घेत नाही. त्यासाठी कृष्णभक्ती करणे फार महत्त्वाचे आहे. म्हणून श्रीकृष्ण जयंतीच्या दिवसापासून गीता उपदेशाचे आचरण करूया. भगवंताची भक्ती, साधना करत हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्याला वाहून घेऊया. भगवंताचे भक्त बनले, तर स्वतःचे वैयक्तिक जीवनही आनंदी होईल आणि आपल्याला राष्ट्रकार्यातही यश मिळेल !
– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.