Death Threat Pak Chief Justice : पाकिस्‍तानच्‍या सरन्‍यायाधिशांना ठार मारण्‍याची धमकी मिळाल्‍यानंतर त्‍यांनी खटल्‍याचा निर्णय पालटला !

सरन्‍यायाधीश काझी फैज इसा

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – पाकिस्‍तानच्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाने ईश्‍वर निंदा करणार्‍या अहमदिया समाजातील व्‍यक्‍तीला निर्दोष मुक्‍त केल्‍याचा स्‍वतःचा निर्णय पालटला आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाने यापूर्वी दिलेल्‍या निर्णयामुळे सहस्रो मुसलमानांनी याचा विरोध करत सर्वोच्‍च न्‍यायालयात घुसून सरन्‍यायाधिशांना ठार करण्‍याची धमकी दिली होती. ‘सरन्‍यायाधीश काझी फैज इसा (Qazi Faez Isa)  यांंना जो कुणी ठार मारेल, त्‍याला ‘तहरीक-ए-लब्‍बेक पाकिस्‍तान (टी.एल्.पी.)’ या जिहादी संघटनेकडून १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्‍यात येईल’, अशी घोषणा या जिहादी संघटनेने केली होती. यानंतर सरन्‍यायाधिशांनी त्‍यागपत्र दिले होते.

अहमदिया समाजातील व्‍यक्‍तीला निर्दोष मुक्‍त करण्‍याच्‍या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन पाकिस्‍तान सरकारने केले होते. ते न्‍यायाधिशांनी मान्‍य केले आहे. यासोबतच त्‍यांनी निकालपत्रात ‘अहमदिया समुदायाला त्‍यांच्‍या धर्माचे पालन करण्‍याचा अधिकार देण्‍यात होता. सुधारित आदेशातून त्‍यांनी यासह अनेक ‘वादग्रस्‍त परिच्‍छेद’ काढून टाकले आहेत. पाकिस्‍तानमध्‍ये अहमदिया समाजाला मुसलमान मानले जात नाही. त्‍यातूनच सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयाचा विरोध करण्‍यात आला होता.

अहमदिया मुसलमान कोण आहेत ?

इस्‍लाममध्‍ये साधारण ७३ जाती आहेत. त्‍यांतील अहमदिया ही एक जात आहे. त्‍याची स्‍थापना वर्ष १८८९ मध्‍ये मिर्झा गुलाम अहमद यांनी केेली होती. इस्‍लाममध्‍ये महंमद पैगंबर हे एकमेव प्रेषित आहेत; मात्र अहमद यांनी स्‍वतःला प्रेषित मानले होते. ते स्‍वतःला ‘मसीहा’ (जगाचे कल्‍याण करण्‍यासाठी अवतार घेतलेली व्‍यक्‍ती) मानत. या कारणांमुळेच अन्‍य मुसलमान समाज अहमदिया जातीच्‍या मुसलमानांना ‘मुसलमान’ न समजता ‘काफीर’ (इस्‍लाम न मानणारे) समजतात.

संपादकीय भूमिका

पाकिस्‍तानात कायद्याचे नाही, तर जिहादी, धर्मांध आणि आतंकवादी यांचे राज्‍य आहे, हेच यातून पुन्‍हा लक्षात येते !