Pakistani Flag School Skit : नाटकामध्ये मुलांच्या हाती दिला पाकिस्तानी राष्ट्रध्वज – शाळेची मान्यता रहित करण्याचा आदेश

  • रतलाम (मध्यप्रदेश) येथील प्राथमिक शाळेतील घटना

  • फाळणीच्या वेळेचे दृश्य दाखवण्यासाठी ध्वजाचा वापर केल्याचा शाळेचा दावा

रतलाम (मध्यप्रदेश) – येथील एका प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी आयोजित केलेल्या नाटकात पाकिस्तानी राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात आला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या, म्हणजेच अभाविपच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करत सदर प्राथमिक शाळेविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली.

यानंतर रतलाम जिल्हा प्रशासनाने या आरोपांची चौकशी चालू केली आहे. रतलामच्या ‘बाल कल्याण समिती’ने जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना नोटीस बजावून शाळेची मान्यता रहित करण्याचा आदेश दिला आहे. या घटनेविषयी शाळेचे संचालक दीपक पंथ यांनी सांगितले की, हे नाटक स्वातंत्र्यलढ्यावर आधारित असल्याने भारताच्या फाळणीच्या वेळचे दृश्य दाखवण्यासाठी  राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात आला. त्यामुळे यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे ध्वज होते. पाकिस्तानी ध्वजाचा प्रचार करणे, हा आमचा उद्देश नव्हता. कुणीतरी एक दृश्य चित्रित केले. जे सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. आमच्याकडे नाटकाची संहिता आहे. मुलांना स्वातंत्र्याची गोष्ट सांगण्यासाठी आम्ही एक नाटक आयोजित केले. आम्ही क्षमाही मागितली आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकरणात प्रशासनाने योग्य चौकशी करून निर्णय घ्यावा !