प्रशासकीय अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचारामुळे उत्तरप्रदेशात प्रतिदिन ५० सहस्र गायींच्या हत्या होत आहेत !

भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांचा आरोप

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – पूर्वी गायीची हत्या करण्याचे कुणाचे धाडस होत नसे; पण आज आम्ही दु:खी आहोत. आमच्या राज्यात प्रतिदिन ५० सहस्र गायींच्या हत्या होत आहेत. राज्यात अधिकारी पैसे खात आहेत. सर्व काही लुटले आहे. येथे भ्रष्टाचार शिगेला पोचला आहे. पोलीस अधिकारी केवळ राजकारणात गुंतले आहेत. या सर्वांचे प्रमुख राज्याचे मुख्य सचिव आहेत. त्यांनी माझा खून करण्याची सिद्धता केली आहे. त्यांनी ‘९ एम्एम्’ पिस्तूल खरेदी केली आहे. आमचे मुख्य सचिवांशी कोणतेही वैर नाही. आम्ही त्यांना कधी भेटलो नाही, बोललोही नाही. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचावे, अशी आमची इच्छा आहे, असे आरोप येथील भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केले आहेत. ते येथील पत्रकारांशी बोलत होते.

आमदार नंदकिशोर गुर्जर म्हणाले की, आम्ही अनेक आमदारांसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली होती. गाझियाबादचे पोलीस आयुक्त हटवले जातील, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते.

संपादकीय भूमिका

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आरोपांची चौकशी करून सत्य जनतेसमोर ठेवावे, असेच गोप्रेमींना वाटते !