दक्षिणायन कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान करण्यापासून दत्ता नायक यांना परावृत्त करण्याची मडगाव पोलिसांकडे मागणी
मडगाव, ५ जानेवारी – गोव्यातील मंदिरे आणि मठ यांना ‘लुटारू’ असे संबोधून समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून सामाजिक कलह निर्माण करणारे मडगाव येथील उद्योजक दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात मडगाव शहर पोलीस ठाण्यात ५ जानेवारी या दिवशी तक्रार प्रविष्ट (दाखल) झालेली आहे. तक्रार करतांना श्री ऋषिरंभा राखणदेव देवस्थानचे श्री. अमित नाईक, मडगाव येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचे श्री. जयेश नाईक, घोगळ-मडगाव येथील श्री ज्योतिबा कलामंडळाचे श्री. दीपेश, ‘शिवसाम्राज्य संघटने’चे श्री. दुर्गेश शिरोडकर आदींचा समावेश होता. याविषयी उद्योजक दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात आतापर्यंत काणकोण आणि पणजी येथे मिळून एकूण २ तक्रारी प्रविष्ट झालेल्या आहेत.
याविषयी अधिक माहिती देतांना गोमंतक मंदिर महामंघाचे सचिव श्री. जयेश थळी म्हणाले, ‘‘धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी उद्योजक दत्ता नायक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. उद्योजक दत्ता नायक यांनी इतर धर्मियांविषयी अवमानकारक विधान करण्याचे धाडस करून दाखवावे. मडगाव येथे ५ जानेवारी या दिवशी उद्योजक दत्ता दामोदर नायक यांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमात उद्योजक दत्ता दामोदर नायक यांना हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याविषयीचे विधान करण्यापासून परावृत्त करावे, अशी मागणी मडगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आणि पोलिसांनी कार्यक्रमाच्या पूर्वी आयोजकांना अशी समज देणार असल्याचे आश्वासन गोमंतक मंदिर महासंघाला दिले.’’