|
वास्को, ५ जानेवारी (वार्ता.) – शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले ठिकाण) या वारसा स्थळी गेल्या काही दिवसांपासून ‘जेसीबी’ आदी अवजड यंत्रांच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे उभारण्यास प्रारंभ झाला आहे. दिवसरात्र या ठिकाणी ही कामे केली जात आहेत. गोवा सरकारचे पुरातत्व खाते आणि मुरगाव नियोजन अन् विकास प्राधिकरण
यांनी १७ नोव्हेंबर २०२३ या दिवशी ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात तेथील अनेक अवैध कामांवर प्रकाश टाकला होता. १२ सप्टेंबर २०२४ या दिवशी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहून ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणच्या अवैध बांधकामांवर कारवाई करण्याची सूचना केली होती; मात्र आजतागायत दक्षिण गोव्याचे प्रशासन किंवा पोलीस यांनी या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवर कोणतीच कारवाई केलेली नाही. वारसा स्थळी यंदा ७ ते १६ जानेवारी या कालावधीत अवैधपणे फेस्ताचे आयोजन केले जाणार असून यासाठी दिवसरात्र अवैध बांधकामांचा सपाटा चालू आहे. वारसा स्थळावर पूर्वीच्या अवैध बांधकामांवर कारवाई नाही, तर याउलट आता त्या ठिकाणी नव्याने अवैध बांधकामे केली जात आहेत. यामुळे श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तगणांमध्ये तीव्र असंतोष आहे.
गोवा सरकारचे पुरातत्व खाते आणि मुरगाव नियोजन अन् विकास प्राधिकरण यांनी १७ नोव्हेंबर २०२३ या दिवशी ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात पुढील महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या होत्या.
१. ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळाजवळ एक क्रेन (नोंदणी क्रमांक जीए ०६, एफ् २००१) मंडपाचा खांब उभारण्यासाठी खोदकाम करत होती आणि वारसा स्थळाजवळ एक ट्रक (नोंदणी क्रमांक जीए ०८ यु ६००८) उभा करून ठेवलेला होता. याला पुरातत्त्व खात्याने संमती दिलेली नाही.
२. वारसा स्थळी मंडप उभारण्यात आला होता आणि वारसा स्थळाच्या प्रवेशद्वारावर लोखंडाचे १८ ‘फ्लेग पोस्ट’, ७ लहान लोंखडी क्रॉस आणि एक मोठा लोखंडी क्रॉस लावण्यात आले होते.
३. वारसा स्थळाच्या १५ मीटर अंतरावर एक बांधकाम दिसत आहे आणि हे बांधकाम मूळ सर्व्हे प्लानमध्ये अस्तित्वात नाही.
४. वारसा स्थळी ‘सर्व्हे प्लॉन’मध्ये असलेली विहीर सध्या दिसत नाही
५. वारसा स्थळी पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे, तसेच सुरक्षरक्षकांसाठी खोली आणि चॅपलच्या (छोट्या चर्चच्या) ठिकाणी प्रवेशद्वार बनवण्यात आले आहे.
सर्वेक्षणात नमूद केल्यानुसार वरील सर्व कामे पुढील सरकारी नियमांचे उल्लंघन करून करण्यात आली आहेत.
१. गोवा (भूमी विकास आणि इमारत बांधकाम नियमन) कायदा २००८ आणि गोवा भूमी विकास आणि इमारत बांधकाम नियमन कायदा २०१०
२. गोवा पुरातन वास्तू आणि पुरातत्व स्थळे कायदा १९७८ आणि नियम १९८०
३. गोवा, दमण आणि दिव रेव्हेन्यू कोड १९६८
४. गोवा पंचायत राज कायदा १९९४
५. सार्वजनिक मालमत्तेला हानी पोचवणे कायदा १९८४ चे कलम ३
पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या संवर्धनाच्या शासनाच्या प्रयत्नांवर श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांकडून उपस्थित केले जात आहे प्रश्नचिन्ह !
गोवा सरकारने पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या संवर्धनासाठी अर्थसंकल्पीय तरतूद केलेली आहे आणि विशेष समितीही नियुक्त केलेली आहे; मात्र प्रशासन शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले ठिकाण) या वारसा स्थळाच्या संवर्धनासाठी कोणतेच पाऊल उचलत नसल्याने श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांमध्ये तीव्र असंतोष आहे. सरकारने तातडीने पावले उचलून वारसा स्थळाचे संवर्धन करण्याची मागणी जोर धरत आहे.