पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) – धर्मांतरामुळे माझा धर्म पालटला; मात्र आमची मुळे तपासल्यास मी मूळचा हिंदूच आहे. ही माझी श्रद्धा आहे आणि त्यामध्ये कुणीही पालट करू शकणार नाही, असे सार्वजनिक विधान वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी केले आहे. मंत्री मावीन गुदिन्हो यांच्या या विधानामुळे सामाजिक माध्यमात चर्चेला उधाण आले आहे. काहींनी हे विधान केल्याने मंत्री गुदिन्हो यांचे कौतुक केले आहे, तर काहींनी राजकीय लाभ उठवण्यासाठी त्यांनी हे विधान केल्याची टीका केली आहे.
मंत्री गुदिन्हो पुढे म्हणाले, ‘‘माझा हिंदूंशी अधिक संपर्क येतो. त्यामुळे मी कुठल्याही हिंदूबहुल मतदारसंघातून निवडून येऊ शकतो. मला माझ्या धर्मापेक्षा (ख्रिस्ती धर्मापेक्षा) हिंदु म्हणण्यास अभिमान वाटतो. हा विषय माझ्या हृदयाशी निगडित आहे. मला भाजपही जवळचा पक्ष वाटतो.’’