दान ही भारतीय संस्कृतीची अभिव्यक्ती ! – स्वामी अवधेशानंद गिरी

महाकुंभक्षेत्री ‘नेत्र कुंभ’चे उद्घाटन

मार्गदर्शन करतांना आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद गिरी

प्रयागराज, ५ जानेवारी (वार्ता.) – सनातन संस्कृतीचे मूलतत्त्व परमार्थ आहे, तर दान ही भारतीय संस्कृतीची अभिव्यक्ती आहे, असे प्रतिपादन जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद गिरी यांनी येथे केले. महाकुंभपर्वानिमित्त सेक्टर ६ मध्ये आयोजित ‘नेत्र कुंभ’ म्हणजेच नेत्र चिकित्सा उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, इस्कॉनचे अध्यक्ष स्वामी गौरांग दास प्रभु आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वामी अवधेशानंद गिरी पुढे म्हणाले, ‘‘नेत्र हे मानवी देहाचा सर्वांत संवेदनशील भाग आहे. यामुळे आपण हे जग पाहू शकतो. ‘नेत्र कुंभ’ या उपक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांचे जीवन उज्ज्वल होईल. ते इंद्रधनुषी विश्‍व पाहू शकतील.’’

अशा उपक्रमाचे आयोजन, हे सेवाभावाचे चांगले उदाहरण ! – स्वामी गौरांग दास प्रभु

स्वामी गौरांग दास प्रभु म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या इंद्रियांद्वारे आपण वेगवेगळ्या वस्तू ओळखू शकतो. इंद्रीय निरंतर वेगवेगळ्या वस्तू शोधत असतात. नेत्र नसतील, तर मनुष्य प्रकाशमान जग पाहू शकणार नाही. त्यामुळे या उपक्रमाचे आयोजन, हे सेवाभावाचे चांगले उदाहरण आहे.’’

दृष्टीबाधित व्यक्तींच्या जीवनात प्रकाश येईल ! – डॉ. कृष्ण गोपाल

डॉ. कृष्ण गोपाल म्हणाले की, नेत्र कुंभाद्वारे समाजात चांगला संदेश जाईल की, आता कुणीही दृष्टीबाधित रहाणार नाही. अशा व्यक्तींच्या जीवनात प्रकाश येऊ शकतो.

याप्रसंगी ‘श्री रणछोडदास बापूजी ट्रस्ट’चे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. प्रवीण बसानी आणि ‘सक्षम’ या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद राज यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. आयोजन समितीचे महाव्यवस्थापक सत्य विजय सिंह, महासचिव सर्वज्ञ राम मिश्रा, प्रसारमाध्यम समन्वयक डॉ. कृतिका अगरवाल, डॉ. कमलाकर सिंह, सत्पाल गुलाटी, सत्यवीर सिंह आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक ‘सक्षम’ संस्थेचे राष्ट्रीय संघटनमंत्री चंद्रशेखर यांनी, तर आभारप्रदर्शन कविंद्र प्रताप सिंह यांनी केले.

दान भारतीय संस्कृतीची अभिव्यक्ती

५ लाखांहून अधिक लोकांची नेत्र तपासणी होणार !

‘नेत्र कुंभ’मध्ये ५ लाखांहून अधिक लोकांची नेत्र तपासणी आणि ३ लाखांहून अधिक चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासह भाविकांना विनामूल्य औषधे आणि शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.