खाण आस्थापनाच्या अधिकार्‍यांनी जिवे मारण्याची धमकी दिली

सातार्डा तर्फ साटेलीच्या उपसरपंचांसह तिघांची पोलीस ठाण्यात तक्रार

प्रतिकात्मक छायाचित्र

सावंतवाडी – तालुक्यातील सातार्डा तर्फ साटेली येथे खनिज उत्खनन करणार्‍या खाण आस्थापनाच्या अधिकार्‍यांनी आम्हाला वाटेत अडवून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून कारवाई करावी, अशी तक्रार गावाचे उपसरपंच सहदेव उपाख्य बाबा कोरगावकर, लक्ष्मण नाईक आणि ग्रामपंचायत सदस्य संभाजी नाईक या तिघांनी येथील पोलीस ठाण्यात प्रविष्ट (दाखल) केली आहे.

सातार्डा तर्फ साटेली येथे एका आस्थापनाने ‘लीज’वर (‘लीज’ म्हणजे भूमी तात्पुरत्या स्वरुपात वापरायला देण्याविषयीचा करार) भूमी घेतली आहे. त्या ठिकाणी मध्यंतरीच्या काळात उत्खनन करण्यात आले होते; मात्र ते बंद पडले. त्यानंतर आता पुन्हा येथे उत्खनन चालू करण्यात
आले आहे. यासाठी कोणतीही प्रशासकीय अथवा ग्रामसभेची अनुमती घेण्यात आलेली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावात आस्थापनाच्या, तसेच खनिज उत्खननाच्या विरोधात ग्रामस्थांमध्ये अप्रसन्नता आहे. २ जानेवारीला साटेली मुख्य रस्त्यावर जात असतांना संबंधित आस्थापनाच्या अधिकार्‍यांनी आम्हाला अडवून धमकी दिल्याचा आरोप काेरगावकर आणि नाईक यांनी केला आहे.

‘साटेली येथे अवैधरित्या चालू असलेल्या खनिज उत्खननाच्या विरोधात आमचा प्रशासकीय पातळीवर लढा चालू आहे. यासाठी आम्हाला धमकावण्यात आले असले, तरी आमचा लढा पुढे चालू ठेवणार आहोत’, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांनी या घटनेचे अन्वेषण करून नागरिकांचा आवाज दडपू पहाणार्‍यांवर कारवाई करणे आवश्यक !