चेन्‍नई (तमिळनाडू) येथील व्‍यासरपाडी विनायक मुदलीयार भवन येथे पार पडला वाराहीदेवी याग !

यागाला पू. डॉ. ॐ उलगनाथन् आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची लाभली वंदनीय उपस्‍थिती !

चेन्‍नई (तमिळनाडू) – येथील मैलापूर भागातील व्‍यासरपाडी विनायक मुदलीयार भवन येथे वाराहीदेवी याग ४ आणि ५ जानेवारी २०२५ या दिवशी पार पडला. हा याग श्री. गणपति सुब्रह्मण्‍य स्‍वामी यांनी ‘विश्‍वशांती’साठी आयोजित केला होता. सप्‍तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या एक आध्‍यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना या यागासाठी उपस्‍थित रहाण्‍यास सांगितले होते.

त्‍यानुसार श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ या यागाला पूर्णवेळ उपस्‍थित होत्‍या. याप्रसंगी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचीही वंदनीय उपस्‍थिती लाभली, तसेच माजी क्रिकेटपटू श्री. एल्. शिवरामकृष्‍णन हेही उपस्‍थित होते. या वेळी श्री. गणपति सुब्रह्मण्‍य स्‍वामी यांनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची उपस्‍थितांना ओळख करून दिली, तसेच त्‍यांना यागाच्‍या संपूर्ण कालावधीत पूर्णवेळ प्रार्थना करण्‍यास सांगितली. याप्रसंगी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सर्व संत, सद़्‍गुरु आणि सर्व साधक यांचे आरोग्‍य चांगले रहावे अन् साधकांची साधना निर्विघ्‍नपणे पार पडावी’, यासाठी श्री वाराहीदेवीच्‍या चरणी प्रार्थना केली.

वैशिष्‍ट्यपूर्ण :  ज्‍या वेळी यागाची पूर्णाहुती झाली, तेव्‍हा पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्‍यावर स्‍वामीजींनी पुष्‍पवृष्‍टी केली. त्‍याच वेळी वाराहीदेवीच्‍या गळ्‍यात असलेला हार खाली पडला. यावर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ म्‍हणाल्‍या, ‘‘देवीने सर्व साधकांना, तसेच संस्‍थेच्‍या पुढील कार्याला महर्षीच्‍या माध्‍यमातून आशीर्वाद दिला.’’

श्री. गणपति सुब्रह्मण्‍य स्‍वामी यांचा परिचय

श्री. गणपति सुब्रह्मण्‍य स्‍वामी हे गेल्‍या ३० वर्षांपासून सप्‍तर्षिजीवनाडीपट्टीच्‍या माध्‍यमातून सप्‍तर्षींचे मार्गदर्शन घेत आहेत. सप्‍तर्षींनी सांगितल्‍याप्रमाणे ते ‘विश्‍व शांतीसाठी’ हा याग करत आहेत.