सोनवडे येथे महसूल विभागाने अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यासाठी वापरलेल्या २ होड्या नदीपात्रात बुडवल्या

कुडाळ – तालुक्यामध्ये होत असलेल्या वाळूच्या अवैध उपशाच्या विरोधात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी स्वत: भूमिका घेऊन तालुक्यातील सोनवडे येथील नदीपात्रात वाळूने भरलेल्या २ होड्यांवर कारवाई केली अन् त्या होड्या नदीच्या पात्रात बुडवल्या, तसेच सोनवडे आणि नेरूरपार येथे वाळूच्या उपशासाठी बांधलेले सर्व रॅम्पही (रॅम्प म्हणजे वाळू काढण्यासाठी केलेले विशिष्ट बांधकाम) उद्ध्वस्त केले. महसूल प्रशासनाच्या कारवाईची चुणूक लागताच वाळूचा उपसा करणारे कामगार आणि होड्यांचे मालक पसार झाले.

कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा करून त्याची वाहतूकही अवैधरित्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. याविषयी प्रशासनाकडे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत, तरीही अवैधरित्या वाळूचे उत्खनन आणि त्याची वाहतूक करण्याचे प्रकार चालू आहेत. याची नोंद घेऊन जिल्हाधिकारी पाटील यांनी स्वत:च पुढाकार घेऊन ही कारवाई केली. सोनवडे येथे वाळूने भरलेल्या २ होड्या नदीपात्रात आढळल्या; मात्र त्यावर कामगार किंवा अन्य व्यक्ती उपलब्ध नव्हती. त्यामुळे या होड्या पाण्यात बुडवण्यात आल्या. ही कारवाई ४ जानेवारी या दिवशी पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. अशा प्रकारची कारवाई यापुढेही चालू रहाणार असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांन सांगितले.