दौंड (जिल्हा पुणे), २० ऑगस्ट (वार्ता.) – भाग्यनगर (हैदराबाद) येथून सोलापूर, टेंभुर्णी, भिगवण, पुणे मार्गे मुंबई येथे गोमांस वाहतूक करून नेणारा एक १८ टायरचा कंटेनर ट्रक दौंड गावाच्या हद्दीत येणार असल्याची माहिती गोरक्षक अक्षय कांचन यांना १८ ऑगस्ट या दिवशी मिळाली. हे गोमांस विदेशात पाठवण्यात येणार होते. त्यानुसार कंटेनरची पोलिसांच्या साहाय्याने पहाणी केली असता त्यामध्ये २५ सहस्र किलो वजनाचे गोमांस आणि ४ सहस्र किलो वजनाचे म्हशीचे मांस आढळून आले. कंटेनरसह त्याचे एकूण मूल्य ५९ लाख २० सहस्र रुपये असून हे सर्व जप्त करण्यात आले आहे. गाडीसाठी २८.८ टन परमिट (अनुमती) आहे; परंतु यामध्ये २९ टनहून अधिक गोमांसाने भरले होते. ही गाडी भाग्यनगर येथून गोमांस भरलेली आहे; परंतु या गाडीची बनावट कागदपत्रे उत्तरप्रदेश राज्यामधून बनवलेली आहेत. या प्रकरणी अक्षय कांचन यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक चंद्रकांत साळुंखे यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकाश खोले, प्रतीक कांचन आदी गोरक्षकांच्या आणि दौंड पोलिसांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
दौंड येथे मोठ्या प्रमाणावर गोहत्या होत आहेत. गायींची कत्तल करून हे गोमांस विदेशात पाठवले जात आहे. सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे मत गोरक्षकांनी व्यक्त केले. या कारवाईत गोरक्षक श्री. अक्षय राजेंद्र कांचन यांच्यासह सर्वश्री राहुल सुभाष कदम, सिद्धांत कृष्णा कांचन, प्रकाश बाळकृष्ण खोले आणि तेजस बजरंग संकर आदी गोरक्षक सहभागी होते.
संपादकीय भूमिका :एवढ्या मोठ्या प्रमाणात गोमांसाची अवैध वाहतूक होत असतांना पोलिसांच्या लक्षात कसे येत नाही ? प्रत्येक वेळी गोरक्षक जिवावर उदार होऊन गोमांस पकडून देतात, त्यानंतर पोलीस कारवाई करतात. पोलिसांनी स्वयंप्रेरणेने केलेले गोरक्षण कुठेही दिसत नाही. त्यामुळेच अहोरात्र होणार्या गोहत्या थांबत नाहीत ! |