– श्री. विजय भोर, नवी मुंबई
नवी मुंबई – तुर्भे विभाग कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या तुर्भे गाव आणि तुर्भे कॉलनी परिसरात स्वच्छता विभागाच्या भोंगळ कारभारामुळे कचराकुंड्या रस्त्यावर ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे कचराकुंड्या भरून वाहू लागल्या की, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
‘स्वच्छ भारत अभियान’ या केंद्राच्या उपक्रमांतर्गत ‘कचराकुंडीमुक्त शहर’ या संदर्भात गुण आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील कचराकुंड्या मोठ्या प्रमाणात हटवण्यात आल्या आहेत. वाणिज्य संकुलांच्या ठिकाणी काही प्रमाणात या कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मूळ गावठाण आणि झोपडपट्टी विभाग या ठिकाणीही घरोघरी घंटागाडी जाऊ शकत नसल्याने याही परिसरात काही ठिकाणी कचराकुंड्या दिसून येत आहेत.
पूर्वी मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी कचराकुंड्या होत्या. त्यामुळे नागरिक सवयीप्रमाणे त्या ठिकाणी कचरा टाकत होते. त्यातील काही ठिकाणच्या कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्याने नागरिक सवयीप्रमाणे आता थेट रस्त्यावरच कचरा टाकत आहेत. याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडे म्हणावे तसे मनुष्यबळ किंवा यंत्रणा नाही.
तुर्भे विभागात तुर्भे गाव, सेक्टर २० आणि २१, तुर्भे कॉलनी या परिसरांत रस्त्यांवर कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. एका कडेला कचराकुंडी ठेवणे अपेक्षित असतांना थेट रस्त्यावर कचराकुंड्या ठेवल्याने गाड्यांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी काही ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे; परंतु वाहतूक विभाग आणि स्वच्छता विभागही याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येते. तुर्भे येथे ‘योगी एक्झिक्युटिव्ह’ हॉटेलच्या मागे, तुर्भे नाका येथे जाणारा रस्ता, तुर्भे गावात बेकरीकडे जाणारा रस्ता, नागपूर बाजाराच्या समोरील रस्ता, माथाडी भवनसमोर कचराकुंड्या हटवण्यात आलेल्या जागी रस्त्यावर कचरा टाकला जात आहे.