सत्कृत्याने आपण भगवंतालाही प्राप्त करू शकतो ! – ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले  

‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट’च्या वतीने चातुर्मास कीर्तन महोत्सवाचा ४ था दिवस !

कीर्तन करतांना ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले

पुणे – प्राप्त आयुष्यात वाईट कामे करू नका. सत्कृत्याने आपण भगवंतालाही प्राप्त करू शकतो. देवाला खेचून आणण्याचे बळ आपण केलेल्या पुण्यकार्यात आहे. भूतकाळातील कृत्यांचा विचार न करता पुढील आयुष्यात चांगली कृत्ये करून पुण्य कमवा, असे प्रतिपादन गाथा मंदिर, देहू येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांनी केले. ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’ आणि ‘सुवर्णयुग तरुण मंडळ’ यांच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाविषयी बोलतांना ते म्हणाले, ‘‘अभंग हे तारक आहेत. अभंगाप्रमाणे आपले जीवन बनवण्याचा प्रयत्न करावा. अभंग हे भगवंत आणि संत यांच्या कृपेतून निर्माण झालेले आहेत. या अक्षरांमध्ये पुष्कळ बळ आहे. अभंग डोळ्यांसमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करा. अभंग आपल्याला नक्कीच तारणारे आहेत.’’