पुणे – बांगलादेशात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ईशान्येकडील राज्यांत घुसघोरी होण्याची शक्यता असून ती रोखण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. बांगलादेश स्वतंत्र झाला, तेव्हा तेथे १८ टक्के हिंदू होते. आता त्यांची संख्या ३ टक्क्यांवर आली आहे. या हिंदूंच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी व्यक्त केले आहे.
पित्रे पुढे म्हणाले की, वर्ष १९७१ मध्ये जेसोर येथे झालेल्या पाकिस्तान सैन्याच्या शरणागती कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्या वेळी तत्कालिन पूर्व पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांनी केलेल्या कत्तली आम्ही पाहिल्या आहेत. आताही बांगलादेशातील सत्तांतरामागे त्याच विचारांच्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बी.एन्.पी.) आणि ‘जमात-ए-इस्लामी’ यांचा हात आहे. बंगलादेशात चीन आणि अमेरिकेचे हितसंबंध गुंतले असल्याने तेथील घडमोडींमागे या २ देशांचा हात असण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांना दीर्घकाळ आश्रय देणे भारत किंवा ब्रिटनसाठी अडचणीचे ठरू शकते. त्यांनी तटस्थ देशात जाणे अधिक योग्य ठरेल.