जेरुसलेम – पॅलेस्टिनी आतंकवादी गट हमासने ६ ऑगस्ट २०२४ या दिवशी एक निवेदन प्रसिद्ध करून ‘याह्या सिनवार(Yahya Sinwar) याची हमासचा(Hamas) नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती झाली असून त्याने इस्माइल हानियाची जागा घेतली आहे’, असे घोषित केले. याह्या सिनवार याची हमासवर चांगली पकड आहे, असे बोलले जात आहे.
१ जुलै या दिवशी तेहरानमध्ये क्षेपणास्त्रद्वारे केलेल्या आक्रमणात हमासचा प्रमुख हानिया आणि त्याचा एक अंगरक्षक मारला गेला होता. हानियाच्या नेतृत्वाखाली हमासने गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर या दिवशी इस्रायलवर ७५ वर्षांतील सर्वांत मोठे आक्रमण केले होते. यामध्ये १ सहस्र २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
६१ वर्षीय सिनवार याने अर्धे आयुष्य कारागृहात घालवले !
हमासच्या नवीन प्रमुखाचे पूर्ण नाव याह्या इब्राहिम हसन सिनवार आहे. वर्ष १९४८ मध्ये जेव्हा इस्रायलची स्थापना झाली आणि सहस्रावधी पॅलेस्टिनींना त्यांच्या वडिलोपार्जित घरांतून बाहेर काढण्यात आले, तेव्हा याह्या सिनवार याचे पालकही निर्वासित झाले होते. २ इस्रायली सैनिक आणि ४ पॅलेस्टिनी नागरिक यांचे अपहरण आणि हत्या केल्याच्या प्रकरणी सिनवार याला वर्ष १९८९ मध्ये अटक करण्यात आली होती. नंतर त्याला ४ जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तथापि वर्ष २०११ मध्ये इस्रायली सैनिक गिलाड शालितच्या बदल्यात सिनवार याला सोडण्यात आले होते. तोपर्यंत सिनवारने २२ वर्षे कारागृहात काढली होती. वर्ष २०१५ मध्ये याह्या सिनवार याला अमेरिकेने आतंकवादी घोषित केले होते.