SC On Coaching Centers : कोचिंग सेंटर्स मुलांच्‍या जिवाशी खेळत आहेत !

देहलीतील कोचिंग सेंटरमधील दुर्घटनेवर सर्वोच्‍च न्‍यायालयाची टीपणी !

नवी देहली – आम्‍हाला कोचिंग सेंटर्सच्‍या सुरक्षेची काळजी आहे. कोचिंग सेंटर्स मुलांच्‍या जिवाशी खेळत आहेत. ते डेथ सेंटर (मृत्‍यूचे केंद्र) आहेत, असे सर्वोच्‍च न्‍यायालयाने देहलीतील राऊ कोचिंग सेंटरच्‍या तळघरात पाणी भरल्‍याने झालेल्‍या ३ विद्यार्थ्‍यांच्‍या मृत्‍यूच्‍या प्रकरणातील याचिकेवर सुनावणी करतांना म्‍हटले. न्‍यायालयाने केंद्र सरकार आणि देहलीचे मुख्‍य सचिव यांना नोटीस बजावून ‘कोचिंग सेंटरमध्‍ये सुरक्षा नियम लागू केले आहेत का ?’, अशी विचारणा केली आहे.

न्‍यायालयाने म्‍हटले की, आम्‍हाला वाटते की, जर कोचिंग सेंटर्स सुरक्षेच्‍या निकषांची पूर्तता करत नसतील, तर त्‍यांनी ऑनलाईन पद्धतीने शिकवणे चालू करावी. सध्‍या आम्‍ही हे करत नाही.

देहली उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाला आव्‍हान देणार्‍यांना १ लाख रुपयांचा दंड

या प्रकरणात देहली उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाला आव्‍हान दिल्‍याने सर्वोच्‍च न्‍यायालयाने या वेळी कोचिंग सेंटर फेडरेशनचे अध्‍यक्ष, सचिव आणि कोषाध्‍यक्ष यांना १ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

संपादकीय भूमिका

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या जे लक्षात येते, ते पोलीस, प्रशासन आणि सरकार यांच्‍या का लक्षात येत नाही ?