जळगाव येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची मागणी
जळगाव – महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त मागील वर्षांप्रमाणे यंदाही ‘आनंदाचा शिधा’ याचे वितरण महायुती सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे. हा शिधा मागील वर्षी ज्या पिशव्यांमधून देण्यात आला, त्यावर आराध्य दैवत श्री गणेशाचे चित्र छापले होते. ही पिशवी टिकाऊ नसून टाकाऊ असल्याने शिधा काढून झाल्यावर त्या पिशव्या अन्यत्र पडल्याचे आढळून आलेे. त्यामुळे देवी-देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान झाला, तरी शासनाने या वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने देण्यात येणार्या या शिध्याच्या पिशव्यांवर श्री गणेश आणि अन्य कोणत्याही हिंदु देवता अन् राष्ट्रपुरुष यांची चित्रे किंवा छायाचित्रे छापू नयेत, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांना साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. रूपेश बिजेवार यांच्या माध्यमातून देण्यात आले.
निवेदनप्रसंगी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांचे सर्वश्री समाधान पाटील, मनोज बाविस्कर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आकाश फडे, हिंदुत्वनिष्ठ श्री. राज कोळी, माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. शैलेश सपकाळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर आणि मयूर भदाने आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
संपादकीय भूमिका :‘आनंदाचा शिधा’ या पिशव्यांवर श्री गणेशाचे चित्र छापू नये, यासाठी हिंदुत्वनिष्ठांना निवेदन द्यावे लागणे हा धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! |