|
सोलापूर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या कथेच्या निमित्ताने सकल हिंदु समाजाच्या वतीने १९ सप्टेंबरला शहरात ‘जय राजा शिवछत्रपतींचा जय मंगलमय हो, श्री शिवछत्रपती जय हो’चा जयघोष करत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या प्रसंगी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला. प्रारंभी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या हस्ते श्री मल्लिकार्जुन मंदिरात पूजा करण्यात आली. यानंतर शिवग्रंथाची पूजा करून हा ग्रंथ बग्गीत ठेवण्यात आला.
शोभायात्रेच्या अग्रभागी सजवलेल्या बैलगाडीत सनई-चौघडा वाजत होता. त्यामध्ये हलगी पथक आणि भगवा ध्वज घेऊन तीन अश्वारूढ हिंदु तरुण सहभागी झाले होते. राजस्थानी मंडळाचे महिला पथक विविध गीते म्हणत शोभायात्रेत सहभागी होते, तर श्री शंकरलिंग मंदिराच्या महिला लेझीम पथकाने लेझीमचे आकर्षक प्रकार सादर करीत वातावरण भगवेमय केले. ‘सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन’च्या चित्तथरारक शिवकालीन मर्दानी खेळाने शोभायात्रेतील उत्साह वाढला. ‘ज्ञानप्रबोधिनी प्रशाले’च्या बर्ची पथकाने आकर्षक सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. पतंजलि महिला पथक, अक्कनबळग संस्थेच्या महिला पथकांनी विविध गीते, घोषणांनी शोभायात्रेत रंगत आणली.
सजवलेल्या बग्गीत प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज विराजमान झाले होते. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. वारकरी मंडळाच्या टाळ – मृदुंगाच्या पथकाने वातावरण भक्तीमय होत होते. या शोभायात्रेत प्रसिद्ध लेखापरीक्षक श्री. राजगोपाल मिणीयार, सर्वश्री हेमंत पिंगळे, सतीश सिरसिल्ला, आकाश शिरते, विश्व हिंदु परिषदेचे श्री. पुरुषोत्तम उडता, मल्लिकार्जुन मंदिराचे पुजारी श्री. मनोज हिरेहब्बू, सिद्धरामेश्वेशर काठीचे मानकरी श्री. राजशेखर हिरेहब्बू, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, संगीता जाधव यांसह शहर-जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील विविध मान्यवर सहभागी झाले होते.
सनातन संस्थेच्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचे औक्षण !
या शोभायात्रेत मल्लीकार्जुन मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचे औक्षण करून त्यांना हार घालण्यात आला. या प्रसंगी सौ. सुनीता न्यामणे, सौ. दुर्गा कुलकर्णी, सौ. माधुरी डिंगरे सहभागी झाल्या होत्या.