मुंबई – ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ या राज्यस्तरीय अभियानाचा १९ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. गिरगाव चौपाटी येथे स्वच्छता कर्मचार्यांसह स्वच्छता अभियानात सहभागी होऊन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन केले. या वेळी मुंबई पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांसह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ हे अभियान २ ऑक्टोबरपर्यंत राज्यात राबवण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवून यंत्राद्वारे कचरा संकलन केले. या अभियानाची अधिक माहिती देतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘या अभियानाद्वारे पर्यटनस्थळावर ‘शून्य कचरा’ कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यातील अस्वच्छ ठिकाणे शोधण्यात आली आहेत. अशी ठिकाणे कायमस्वरूपी स्वच्छ रहाण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाईल. या अभियानात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’त महाराष्ट्र कुठेही अल्प पडणार नाही. ‘स्वच्छ भारत अभियाना’त देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यात दीड लाख झाडे लावली आहेत. या अभियानामध्ये ९ सहस्र ३५९ कार्यक्रमांची नोंदणी झाली आहे. स्वच्छतेसाठी ४ सहस्र ५२० ठिकाणे शोधण्यात आली आहेत. या ठिकाणचा कचरा उचलला जाणार आहे. या ठिकाणी जनतेचा सहभाग घेऊन राज्यभरात ४ सहस्र १११ कार्यक्रम राबवले जाणार आहेत.’’