मिरवणुकीत नाचणार्‍या पोलीस कर्मचार्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मोरे

अहिल्यानगर – पोलीस ठाण्यातील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचणार्‍या पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मोरे यांचा हृदयविकाराच्या झटक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. येथील मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर मोरे कार्यरत आहेत. शहरातील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी गणेशोत्सव साजरा करतात. कोतवाली पोलीस ठाण्यातील श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मोरे हे नाचत होते. विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर ते घरी आले. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले; परंतु उपचार चालू असतांना त्यांचा मृत्यू झाला.

२ युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू !

अहिल्यानगर जिल्ह्यातील विळद गावातील घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास गेलेल्या २ युवकांचा साकळाई तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजिंक्य नवले आणि केतन शिंदे अशी मृतांची नावे आहेत.

वेदपाठशाळेतील विद्यार्थी निरामध्ये बुडाला !

इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथील निरा नदीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या अनिकेत कुलकर्णी हा पाण्यात बुडाला आहे. अनिकेत हा ९ वर्षांपासून लक्ष्मी नृसिंह वेदपाठशाळेत शिक्षण घेत होता. तो निरा नदीच्या लक्ष्मी घाटावर श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास गेला होता. त्याच वेळी पाय घसरून तो नदीमध्ये बुडाला असून त्याचा शोध चालू आहे.