|
थिरूवनंतपूरम् (केरळ) – मंदिर केक कापण्याची जागा नाही. प्रत्येक भाविकाला मंदिराच्या प्रथा आणि परंपरा यांनुसार गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात पूजा करण्याचा अधिकार आहे, असे सांगत केरळ उच्च न्यायालयाने या मंदिर परिसरातील नादपंथल या भागात चित्रीकरण करण्यावर बंदी घातली आहे. एका महिलेने नादपंथलमध्ये केक कापून तिचा वाढदिवस साजरा केला आणि घटनेचे चित्रीकरण केले. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अशा घटना मंदिराच्या प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचे सांगत लोकांनी कारवाईची मागणी केली होती.
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता नादपंथल परिसरात विवाह समारंभ आणि विशिष्ट धार्मिक कार्यक्रम यांंखेरीज कोणत्याही घटनेचे चित्रीकरण करता येणार नाही. नादपंथल ही एक तात्पुरती रचना आहे. भक्तांना उष्णता आणि पावसात निवारा देण्यासाठी मंदिरासमोर ते बांधण्यात आले आहे.
न्यायालयाने म्हटले की, मंदिराच्या आतील भाग, विशेषत: पूर्वेकडील ‘दीपस्तंभ’च्या चित्रीकरणाला अनुमती दिली जाऊ शकत नाही. व्यवस्थापकीय समिती, गुरुवायूर देवस्वमची सुरक्षा शाखा यांना ‘गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिराच्या नादपंथलमध्ये अशी कोणतीही कृती होणार नाही, ज्यामुळे भाविकांना त्रास होईल’, याची निश्चिती करावी लागेल. यामध्ये अल्पवयीन मुले, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्ती यांचा समावेश आहे.
आवश्यक असल्यास देवस्वोम प्रशासक पोलिसांचे साहाय्य घेऊ शकतात. अशा परिस्थितीत पोलीस आवश्यक ते सहकार्य करतील. गुरुवायूर देवस्वम व्यवस्थापन समिती गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात भाविकांकडून भगवान गुरुवायरप्पनच्या योग्य पूजेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यास बांधील आहे, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.