गणेशोत्‍सव मंडळांना मंडपासाठी मिळणार ५ वर्षांची अनुमती !

६ ऑगस्‍टपासून ‘एक खिडकी योजने’नुसार ऑनलाईन अनुमती मिळणार !

मुंबई – गणेशोत्‍सव साजरा करणार्‍या मंडळांना मंडप उभारण्‍यासाठी अनुमती देण्‍याची प्रक्रिया ६ ऑगस्‍टपासून चालू होणार आहे. १० वर्षांपासून शासन नियम आणि कायदा यांचे पालन करणार्‍या अन् कोणतीही तक्रार नसलेल्‍या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांना सलग ५ वर्षांसाठी विभाग कार्यालयाकडून एकदाच अनुमती देण्‍यात येणार आहे. असे असले, तरी प्रतिवर्षी अनुमतीचे नूतनीकरण करणे आवश्‍यक असेल. नूतनीकरणात वाहतूक आणि स्‍थानिक पोलीस यांची अनुमती प्राप्‍त करणे आवश्‍यक असेल. खासगी जागेवर अनुमती प्राप्‍त झालेल्‍या मंडळांना उत्‍सवापूर्वी विहित कालावधीत जागामालक अथवा सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्‍त करून घेणे आवश्‍यक असेल.

‘एक खिडकी योजने’नुसार ६ ऑगस्‍टपासून संगणकीय प्रणालीद्वारे सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाईन अनुमती देण्‍यात येईल. प्राप्‍त अर्जांची विभागीय कार्यालयाकडून पडताळणी करण्‍यात येईल. त्‍यानंतर स्‍थानिक पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस यांचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्‍त करून नियमानुसार मंडपासाठी अनुमती देण्‍यात येईल. यंदा नव्‍यानेच सार्वजनिक उत्‍सव साजरा करणार्‍या मंडळांसाठी देण्‍यात येणारी मंडप उभारण्‍याची अनुमती ही या वर्षासाठीच मर्यादित असेल.

उत्‍सवासाठी १०० रुपये शुल्‍क आकारणार !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या आदेशानुसार बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांकडून वर्ष २०२४ च्‍या उत्‍सवासाठी अवघे १०० रुपये शुल्‍क आकारण्‍यात येणार आहे. महानगरपालिकेच्‍या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्‍थळावर ६ ऑगस्‍ट या दिवशी सकाळी १० वाजल्‍यापासून संगणकीय ‘एक खिडकी’ पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत.

५०० टन शाडू मातीचे विनामूल्‍य वाटप !

पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा व्‍हावा, यासाठी श्री गणेशमूर्ती सिद्ध करणार्‍या मूर्तीकारांना शाडूची माती विनामूल्‍य आणि मंडपासाठी नि:शुल्‍क जागा देण्‍यात आली आहे. गणेशोत्‍सवासाठी मूर्तीकारांना देण्‍यात आलेली अनुमती नवरात्रोत्‍सवापर्यंत कायम राहील. याशिवाय मूर्तीकारांसाठी ‘एक खिडकी योजना’ही राबवण्‍यात आली आहे. आतापर्यंत २१७ मूर्तीकारांना अनुमाने ५०० टन शाडू माती विनामूल्‍य देण्‍यात आली आहे. त्‍यामुळे शाडू मातीपासून सिद्ध केलेल्‍या श्री गणेशमूर्तींची स्‍थापना करण्‍याचे प्रमाण यंदा वाढण्‍याची शक्‍यता आहे.