हरिपूर (सांगली) रस्त्यावरील भगवा ध्वज पोलीस प्रशासन आणि महापालिका यांनी काढल्यामुळे तणाव !
संतप्त शिवभक्तांकडून ‘रस्ता बंद’ आंदोलन !
सांगली, ३० जुलै (वार्ता.) – येथील हरिपूर रस्त्यावरील लोखंडी पुलावर वर्ष २०१६ ला बसवलेला भगवा ध्वज पोलीस प्रशासन आणि महापालिका यांनी काढल्यामुळे संतप्त झालेल्या शिवभक्तांनी २९ जुलै या दिवशी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी भाजपच्या नेत्या आणि अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे शिवभक्रत यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पोलीस प्रशासनाने भगवा ध्वज परत त्यांच्या कह्यात दिला.
६ मासांपूर्वी ध्वजाच्या ठिकाणी एक नागरिक नशेमध्ये असतांना धडकून घायाळ झाला होता. त्यामुळे तो ध्वज काढण्यात आला होता. याविषयी शिवगर्जना मंडळातील सर्व शिवभक्त आणि परिसरातील नागरिक ध्वज मिळावा यासाठी महापालिकेमध्ये पाठपुरावा करत होते; परंतु पोलीस आणि महापालिका प्रशासन ध्वज देत नव्हते. शेवटी सर्व शिवभक्तांच्या रेट्यामुळे आणि अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांना हा ध्वज परत द्यावा लागला.
या वेळी माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेवक युवराज बावडेकर, अभिमन्यू भोसले, दिगंबर साळुंखे, अवधूत जाधव, प्रदीप निकम, गजानन मोरे यांसह शिवभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.