हिमाचल प्रदेशमधील बनखंडी येथील श्री बगलामुखीदेवी मंदिरात सर्वत्र साधकांच्या रक्षणासाठी पार पडले ‘बगलामुखी हवन’ !

बनखंडी (हिमाचल प्रदेश) – महर्षींच्या आज्ञेनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिमाचल प्रदेशमधील बनखंडी (जिल्हा कांगडा) या ठिकाणी असलेल्या प्राचीन श्री बगलामुखीदेवी मंदिरात जाऊन साधकांच्या रक्षणासाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी ‘बगलामुखी होम’ केला. हा होम २३ जुलै २०२४ या दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत पार पडला. या मंदिराच्या विश्वस्त महंत राजकुमारी देवी यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे आदरपूर्वक स्वागत केले. याप्रसंगी महंत राजकुमारी देवी यांनी मंदिरात देवदर्शन थांबवून वेदमंत्रांच्या घोषात गाभार्‍यात बगलामुखीदेवी समोर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना उभे करून त्यांचा सत्कार केला. या वेळी महंत राजकुमारी देवी म्हणाल्या, ‘‘माताजी, तुम्हाला पाहून मला पुष्कळ आनंद झाला. तुम्ही जी जी प्रार्थना करणार, ती सर्व श्री बगलामुखीदेवी पूर्ण करणार.’’ यानंतर श्री बगलामुखीदेवी मंदिराचे पुजारी पंडित रोहित शर्मा यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून ‘बगलामुखी होमा’साठी संकल्प पूजा करवून घेतली आणि त्यानंतर बगलामुखी होम करण्यात आला.

होमापूर्वी संकल्प पूजन करतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि उपस्थित पुजारी

श्री बगलामुखीदेवीचे महत्त्व

हिमाचल प्रदेशमधील बनखंडी (जिल्हा कांगडा) या ठिकाणची श्री बगलामुखीदेवीची मूर्ती

श्री बगलामुखीदेवी ही दशमहाविद्या देवींमधील ८ वी देवी आहे. श्री बगलामुखीदेवी तंत्रविद्येची देवता आहे. ती षट्कर्म सिद्धि प्रदान करणारी देवता म्हणून मानली जाते. बगलामुखीदेवीचे भक्त शत्रूनाशासाठी बगलामुखीदेवीची उपासना करतात. तंत्रविद्येतील मारण, संमोहन, वशीकरण, स्तंभन, उच्चाटन, विद्वेषण यांमुळे निर्माण होणार्‍या त्रासांच्या निवारणासाठी श्री बगलामुखीदेवीची उपासना केली जाते. श्री बगलामुखीदेवीला ‘पितांबरा’, ‘शत्रूनाशिनी’, ‘ब्रह्मास्त्र विद्या’ आणि ‘गुप्त विद्या’ या नावांनीही संबोधले जाते. (संदर्भ : www.maabaglamukhiofficial.org)