श्री. यशवंत कणगलेकर ‘सनातन प्रभात’ची नियतकालिके, तसेच ‘सनातन पंचांग’ यांसाठी विज्ञापने मिळवण्याच्या दृष्टीने जिज्ञासूंना संपर्क करण्यासाठी वर्ष २००२ मध्ये चेन्नई येथे गेले होते. जिज्ञासूंना संपर्क करतांना संत आणि साधक यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे, तसेच लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. पू. पट्टाभिराम प्रभाकरन् (सनातनचे १०५ वे संत, वय ७८ वर्षे), चेन्नई
जेव्हा श्री. यशवंत कणगलेकर ‘सनातन पंचांगा’साठी विज्ञापने मिळवण्यासाठी जात असत, तेव्हा ते सनातन पंचांगाची पुढील उल्लेखनीय वैशिष्ट्ये सांगत असत.
अ. जेथे सनातन पंचांग असते, तेथील सभोवतालचा परिसर शुद्ध होतो.
आ. सनातन पंचांगामध्ये देवतांची चित्रे, तसेच संतांची छायाचित्रे आहेत. त्यामुळे व्यक्तीला सात्त्विक स्पंदनांचा लाभ होतो.
इ. सनातन पंचांगामध्ये राष्ट्र, धर्म, धर्माचरण, सण-उत्सव इत्यादी विषयांचे लेख आहेत.
यानंतरही जिज्ञासूंना विषय न पटल्यास काका त्यांना काही सनातन पंचांगे विकत घेऊन त्यांची वैशिष्ट्ये अनुभवण्यास सांगत असत.’
२. पू. (सौ.) उमा रविचंद्रन् (सनातनच्या ७० व्या संत, वय ५७ वर्षे), चेन्नई
अ. ‘कणगलेकरकाका जिज्ञासूंना सनातन संस्थेच्या कार्याच्या अंतर्गत होत असलेल्या उपक्रमांची थोडक्यात; मात्र अगदी सुस्पष्ट ओळख करून देत असत. ‘जिज्ञासूला कोणत्या विषयात रस आहे ?’, हे पाहून ते विषय सांगत असत.
आ. काकांनी सनातन-निर्मित ग्रंथांचा सखोल अभ्यास केला असून त्यांतील महत्त्वाची सूत्रे ते योग्य वेळी जिज्ञासूंना सांगत असत.
इ. त्यांनी अन्य साधकांनाही जिज्ञासूंना अध्यात्माविषयी माहिती सांगण्यास स्वतःप्रमाणे सिद्ध केले आहे.
ई. बुद्धीच्या स्तरावर विचार करणार्या जिज्ञासूंना ते बौद्धिक स्तरावर माहिती सांगून विषय पटवून देत असत. त्याचप्रमाणे एखाद्या जिज्ञासूमध्ये भाव असल्याचे काकांच्या लक्षात आल्यास त्याची भावजागृती होईल, अशा पद्धतीने ते विषय सांगत असत.
उ. त्यांना असलेले विषयाचे आकलन पाहून आम्ही प्रभावित झालो, तरी त्याविषयी त्यांना जराही कर्तेपणा नसायचा. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्याकडून माहिती सांगून घेतली’, असे म्हणून ते सर्व श्रेय परात्पर गुरु डॉक्टरांनाच देत असत.
काकांच्या माध्यमातून आम्हाला ‘आध्यात्मिक स्तरावर विषय कसा मांडायचा ?’, हे शिकवले आणि आम्हाला सिद्ध केले’, यासाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
३. श्री. काशीनाथ शेट्टी (वय ६२ वर्षे), बेळगाव, कर्नाटक.
अ. ‘श्री. कणगलेकरकाका चेन्नई सेवाकेंद्रात असतांना लादी झाडणे आणि पुसणे, स्वयंपाक बनवणे, भांडी घासणे इत्यादी सर्वच सेवांमध्ये साधकांना साहाय्य करत. ‘मी या सेवा का करू ?’, असा विचार न करता ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने ते सर्व सेवा करत असत.
आ. काकांच्या प्रत्येक कृतीतून त्यांची गुरुकार्याची तळमळ दिसून येत असे. अधिकाधिक आणि परिणामकारक अध्यात्मप्रसार होण्यासाठी ते नवनवीन कल्पना शोधून त्या कृतीत आणत असत. चेन्नई येथे साधकसंख्या अल्प असल्याने त्यांनी अध्यात्मप्रसाराचे नवीन मार्ग शोधले होते.
इ. काका जिज्ञासूंना स्वतःच्या भाषेत आणि ‘ते (जिज्ञासू) संतुष्ट होतील’, अशा पद्धतीने अध्यात्माविषयी माहिती सांगत असत.
ई. ज्या लोकांना अध्यात्माविषयी काही ठाऊक नसायचे, ते लोकही काकांनी माहिती सांगितल्यावर सहज आकर्षित आणि प्रभावित होत असत.
उ. जिज्ञासूंना अध्यात्माविषयी माहिती सांगण्यास साधकांनाही सिद्ध करण्यासाठी ते स्वतः काही न बोलता अन्य साधकांना माहिती सांगण्यास सांगत आणि नंतर साधकांकडून बोलतांना काही चूक झाल्यास त्यांना ती चूक सांगत असत.
ऊ. त्यांनी नवीन साधकांना सत्संग घेण्यासाठीही सिद्ध केले आहे.
ए. काकांचे वय अधिक असूनही चेन्नईच्या उष्ण वातावरणात ते सेवेसाठी बाहेर पडत असत. सकाळी लवकर उठून ते नामजपादी उपाय पूर्ण करत असत.
ऐ. ‘अध्यात्मप्रसाराच्या कार्यात इतरांना कसे सहभागी करून घेता येईल ?’, याचे ते सतत चिंतन करत असत.
ओ. प्रसारकार्यातील एखादा उपक्रम असल्यास निर्धारित वेळेच्या आधी पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करायचे, उदा. सनातन पंचांगासाठी विज्ञापने मिळवण्याची सेवा ते एक वर्ष आधीच चालू करत आणि ठरवलेल्या वेळेत ती पूर्ण करत असत.
औ. प्रसारासाठी जिज्ञासूंना भेटल्यावर ‘ते काही अर्पण देतील कि नाही ?’, याविषयी मनात शंका न ठेवता ‘गुरुकार्यासाठी जे आवश्यक असेल, ते मिळेल’, असा त्यांचा सकारात्मक विचार असे. ‘जिज्ञासू जे काही अर्पण देतील, त्याचा त्यांना (जिज्ञासूंना) आध्यात्मिकदृष्ट्या अनेक पटींनी लाभ कसा होऊ शकतो ?’, हे काका चांगल्या पद्धतीने समजावून सांगत असत.’