आजगाव येथे ८४० हेक्टर भूमीवर जिंदालचा खनिज प्रकल्प होण्याची शक्यता

सरकारची सर्वेक्षणास अनुमती असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे

सावंतवाडी – तालुक्यातील आजगाव येथे ८४० हेक्टर भूमी क्षेत्रावर जिंदाल आस्थापनाचा खनिज प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी ८ जुलै या दिवशी सर्वेक्षण केले जाणार आहे. या प्रकल्पाविषयी संबंधित आस्थापनाचे अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात एक पत्र घेऊन आले होते. ‘राज्य सरकारने सर्वेक्षण करण्यास अनुमती दिली आहे. त्याची माहिती देण्यासाठी पत्र घेऊन ग्रामपंचायतीत आलो आहे’, असे त्या अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे ‘ग्रामपंचायतीची अनुमती नसेल, तर असा प्रकल्प कसा होऊ शकतो ?’, अशी चर्चा गावात चालू झाली आहे.

आजगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ४ जुलै यादिवशी संबंधित आस्थापनाचे अधिकारी खनिज प्रकल्पाविषयीचे पत्र घेऊन आले होते. ‘खनिज प्रकल्पासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी अनुमती दिली आहे. ८ ते ३० जुलै या कालावधीत हे सर्वेक्षण करणार आहोत’, असे या पत्रात म्हटले आहे.

प्रकल्पाच्या विरोधात आज ग्रामस्थांची सभा

यापूर्वी येथील प्रस्तावित खनिज प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. आता पुन्हा या प्रकल्पासाठी गावातील भूमीत किती खनिजाचा साठा आहे, हे पडताळण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या ८४० हेक्टर क्षेत्रात स्थानिकांची घरे, शेतभूमी, बागायती असून येथे खनिज प्रकल्प झाल्यास सर्व विस्थापित होणार आहेत, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या प्रकल्पाच्या विरोधात ७ जुलै या दिवशी दुपारी ३.३० वाजता आजगाव मराठी शाळेत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.