‘भारताने विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोन ठेवावा’, याविषयी आग्रह धरणारे पुस्तक !

‘लिप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’ पुस्तकाचे परीक्षण

‘लिप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’ या पुस्तकात आर्थिक वाढीच्या पलीकडे जाऊन ‘लिप फ्रॉगिंग’ (लहान अडथळ्यांवरून उड्या मारत धावणे)चे समाज आणि पर्यावरण यांवर होणार्‍या परिणामांविषयी संशोधन करण्यात आले आहे. ‘लिप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’ हे पुस्तक अत्यंत प्रेरणादायी आणि अंतर्दृष्टी निर्माण करणारे आहे. या पुस्तकात दिलेली ‘लिप फ्रॉगिंग’ची संकल्पना नाविन्यता आणि आर्थिक वाढ यांविषयी आहे.

पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि रवि पंडित यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात ‘लिप फ्रॉगिंग’च्या माध्यमातून विकास करण्याविषयीच्या पारंपरिक पायर्‍या जलद गतीने ओलांडून विकसनशील राष्ट्रे त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांवर कशा प्रकारे मात करू शकतील ? याविषयी लेखन केले आहे. ‘लिप फ्रॉगिंग’ या संकल्पनेनुसार मधले काही टप्पे वगळून भारत कशा प्रकारे लक्षणीय प्रगती करू शकतो, याविषयी संशोधन केले आहे. लेखकांनी या संकल्पनेचा विस्तार ‘पोल व्हॉल्टिंग’ (‘पोल व्हॉल्ट’ या खेळातील प्रकारामध्ये खेळाडू लांब काठीच्या साहाय्याने एकदम उंच उडी मारू शकतो), म्हणजे नवीन धोरणे अवलंबून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून भारत अजून उच्च स्थान कसे प्राप्त करू शकतो, यांविषयी सांगितले आहे. या पुस्तकाविषयीची काही सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

‘लिप फ्रॉगिंग’ या संकल्पनेची पार्श्वभूमी

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

पुस्तकाचे लेखक डॉ. माशेलकर आणि पंडित यांनी ‘लिप फ्रॉगिंग’विषयीच्या ऐतिहासिक संदर्भाची रूपरेषा स्पष्ट केली, तसेच इतर विकसित देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारत आणि चीन यांनी पारंपरिक विकासाच्या टप्प्यांना कशी बगल दिली, तेही सांगितले. त्यांनी यशस्वीपणे ‘लिप फ्रॉगिंग’ करण्यास योगदान देणारे तांत्रिक विकास, धोरणातील सुधारणा आणि उद्योजकतेचा आत्मा हे घटक शोधले आहेत.

स्पष्ट आणि प्रत्यक्षात आणण्यायोग्य कल्पना

गुंतागुंतीच्या संकल्पनांविषयी स्पष्ट सादरीकरण, हे या पुस्तकाचे बळ आहे. या पुस्तकात लेखकांनी त्यांची सूत्रे परिणामकारकपणे मांडण्यासाठी जगात प्रत्यक्ष घडणारी उदाहरणे आणि एखाद्या सूत्राविषयीचा विशेष अभ्यास दिला आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) क्षेत्रातील क्रांतीपासून ते उत्पादनामध्ये चीनने केलेली प्रगती ही सूत्रे सांगताना ‘लिप फ्रॉगिंग’मुळे काही राष्ट्रे जगातील स्पर्धेत कशी पुढे गेली, याविषयी सांगितले आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

१. कृती करण्यासाठी प्रोत्साहन देणारे व्यावहारिक मार्गदर्शक

हे पुस्तक केवळ शैक्षणिक नसून कृती करण्यास प्रोत्साहन देणारे व्यावहारिक मार्गदर्शक आहे. सध्याची निकड लक्षात घेऊन लिहिलेला हा ग्रंथ ‘लिप फ्रॉगिंग’च्याही पुढे जाऊन सक्रीय ‘पोल व्हॉल्टिंग’चे समर्थन करतो. अनेक किस्से आणि उदाहरणे असलेले हे पुस्तक धोरण ठरवणारे, उद्योजक अन् विविध स्तरांतील वाचक यांना भावणारे आहे.

२. ‘लिप फ्रॉगिंग’च्या सामाजिक आणि पर्यावरण यांविषयीच्या परिणांमाचे अन्वेषण

या पुस्तकात आर्थिक वाढीच्या पलीकडे जाऊन ‘लिप फ्रॉगिंग’चे सामाजिक आणि पर्यावरण यांविषयीच्या परिणामांचे अन्वेषण करण्यात आले आहे. लेखकांनी टिकाऊ, स्थिर विकास आणि सर्वसमावेशक वाढ यांवर भर दिला आहे. ‘या क्षेत्रांमध्ये ‘लिप फ्रॉगिंग’ हे उत्प्रेरक होऊ शकते. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर राष्ट्राला लाभ होऊन जगाच्या प्रगतीला साहाय्य होईल’, असे त्यांनी म्हटले आहे. यात धोरण ठरवणारे, उद्योजक आणि नवीन कल्पना कार्यवाहीत आणू इच्छिणार्‍यांना कृतीसंदर्भातील अंतर्दृष्टी दिली आहे. यामध्ये त्यांनी शिक्षणाची भूमिका, संशोधन आणि विकास, बौद्धिक मालमत्तेविषयीचे अधिकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र यांचा समन्वय या सूत्रांविषयी चर्चा केली आहे. याखेरीज ‘लिप फ्रॉगिंग’ करण्यास समोर असलेली आव्हाने आणि येणारे अडथळे यांविषयी सांगून त्यावर मात करण्यासाठी कोणते धोरण ठेवावे, हेही सांगितले आहे.

३. पुस्तकाचा विशाल दृष्टीकोन

हे पुस्तक जरी मूलतः भारतावर लक्ष केंद्रित करून लिहिले आहे, तरी यातील संकल्पना आणि तत्त्वे ही जलद प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या कोणत्याही देशासाठी उपयुक्त आहेत. लेखकांचा नाविन्य आणि उद्योजकता यांविषयीचा गाढा अभ्यास असल्याने त्यांचे याविषयीचे दृष्टीकोन अतिशय समृद्ध असून हे पुस्तक जगासाठी उपयोगी आहे.

लेखकांचा परिचय

१. डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा परिचय

डॉ. रघुनाथ माशेलकर

डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ असून ‘केमिकल इंजिनीयरिंग’ आणि वैज्ञानिक धोरण या क्षेत्रांत दिलेल्या भरीव योगदानाविषयी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी वैज्ञानिक संशोधन, नाविन्यता आणि धोरणे अशा विविध क्षेत्रांमध्ये सल्ला देऊन त्यांचा ठसा उमटवला आहे. त्यांनी ‘कौन्सिल ऑफ सायंटीफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च’ या जगातील मोठ्या संस्थेमध्ये ‘महासंचालक’ म्हणून काम पाहिले असून इतर अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ हे पुरस्कार दिले असून त्यांना इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना ‘रॉयल सोसायटी’ या संस्थेची ‘फेलोशिप’ (शिष्यवृत्ती) मिळाली आहे. त्यांना अनेक विद्यापिठांकडून ‘मानद विद्यावाचस्पती (डॉक्टरेट)’ ही पदवीही प्रदान केली आहे.

२. रवि पंडित यांचा परिचय

श्री. रवि पंडित

हे एक प्रमुख उद्योजक आणि व्यापारी क्षेत्रातील नेते असून ‘के.पी.आय.टी. टेक्नोलॉजिस’ या जागतिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञानाविषयी सल्ला देणार्‍या आणि उत्पादन अभियांत्रिकी यांविषयी मार्गदर्शन करणार्‍या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी व्यापार आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानाचा सर्वत्र परिचय आहे. उद्योजक आणि नाविन्यता यांसाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

४. तंत्रज्ञानावर अधिक प्रमाणात भर

या पुस्तकात एक अल्प असा दोष आहे. तो म्हणजे या पुस्तकात काही वेळा विशिष्ट तंत्रज्ञान आणि धोरण यांच्या आराखड्याविषयी चर्चा करतांना तंत्रज्ञानावर अधिक प्रमाणात भर दिला आहे. असे असले, तरी लेखकांची आवड आणि अनुभव यांमुळे हे पुस्तक एकंदर गुंतवून ठेवणारे आणि माहितीपूर्ण आहे. या पुस्तकात ‘लिप फ्रॉगिंग’चे विविध पैलू सांगितलेले असून ही संकल्पना आणि त्याचे परिणाम यांविषयीचे सर्वसमावेशक परीक्षण दिले आहे. या पुस्तकातील अजून काही महत्त्वाची सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

५. ‘लिप फ्रॉगिंग’ शक्य करण्यासाठी धोरणांमध्ये सुधारणा

‘लिप फ्रॉगिंग’ शक्य करण्यासाठी धोरणांमध्ये कराव्या लागणार्‍या सुधारणांवर लेखकांनी भर दिला आहे. सरकारने अनुकूल धोरणे लागू करून त्यामध्ये येणारे नोकरशाहीविषयक अडथळे दूर करून सार्वजनिक आणि खासगी क्षेत्र यांच्यातील भागीदारीला प्रोत्साहन देऊन अनुकूल वातावरण निर्माण करण्याविषयी लेखकांनी चर्चा केली आहे. यासमवेतच त्यांनी बौद्धिक मालमत्तेविषयी अधिकारांचे महत्त्व आणि या अधिकारांचे संरक्षण करणे आणि ज्ञान मिळवणे यांवर चर्चा केली आहे.

६. शिक्षणाचे महत्त्व आणि कौशल्य विकास यांवर प्रकाशझोत

‘लिप फ्रॉगिंग’ला साहाय्य होण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व आणि कौशल्य विकास या दोन सूत्रांवर लेखकांनी प्रकाश टाकला आहे. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेविषयी मानसिकता जोपासणे आणि नाविन्य आणण्यासाठी त्यांना आवश्यक कौशल्ये शिकवणे यांविषयी शैक्षणिक संस्थांची भूमिका काय असावी, याचे परीक्षण त्यांनी केले आहे. जीवनभर शिकत रहाणे आणि पालटणार्‍या जगाविषयी सतत अद्ययावत् रहाणे, ही संकल्पना त्यांनी मांडली आहे.

७. प्रकरणांचा अभ्यास आणि प्रत्यक्ष व्यवहारातील उदाहरणे

डॉ. माशेलकर आणि पंडित यांनी त्यांचा युक्तीवाद पटवून देण्यासाठी पुस्तकामध्ये काही प्रकरणांचा अभ्यास, तसेच प्रत्यक्ष व्यवहारातील उदाहरणे दिली आहेत. या उदाहरणांमध्ये आरोग्याची काळजी आणि शेती यांमधील महत्त्वाच्या संशोधनापासून ते यशस्वी उद्योजकांनी केलेले उपक्रम यांचा समावेश आहे. जगातील प्रत्यक्ष विविध उदाहरणे देऊन ‘लिप फ्रॉगिंग’मुळे विविध क्षेत्रे आणि कारखाने यांमध्ये झालेले पालट त्यांनी सांगितले आहेत.

८. ‘लिप फ्रॉगिंग’मध्ये तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका

या पुस्तकात ‘लिप फ्रॉगिंग’मध्ये तंत्रज्ञानाच्या भूमिकेविषयी अधिक सविस्तर माहिती दिली आहे. पायाभूत सुविधांमधील उणिवांवर मात करून जलद प्रगती करण्यासाठी माहिती आणि संभाषण तंत्रज्ञानातील प्रगतीचा कशा प्रकारे लाभ करून घेता येईल, याविषयी परीक्षण केले आहे. आर्थिक समावेश, इ-कॉमर्स, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये भ्रमणसंच, इंटरनेट अन् ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ यांच्यात परिवर्तन घडवून आणण्याच्या क्षमतेविषयी चर्चा केली आहे.

९. नाविन्याविषयीची ‘इकोसिस्टीम’ (यंत्रणा) सिद्ध करणे

लेखकांनी ‘लिप फ्रॉगिंग’ला साहाय्य होण्यासाठी भक्कम अशी नाविन्यपूर्ण ‘इकोसिस्टम’ सिद्ध करण्याचे महत्त्व सांगितले आहे. नाविन्यता, उद्योजकता आणि ज्ञानाची देवाण-घेवाण यांमध्ये वाढ होण्यासाठी शिक्षणक्षेत्र, उद्योग आणि सरकार यांचा सहयोग असण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नवीन संकल्पनांमध्ये वाढ करण्ो आणि त्याची मोजणी करण्यासाठी संकल्पना राबवणे, त्याला चालना देणे आणि निधी उपलब्ध करणे या गोष्टींची निर्मिती करण्याचे महत्त्व विषद केले आहे.

१०. अपयशातून धडा घेण्याचे महत्त्व

यश मिळवलेली उदाहरणे सांगण्यासह लेखकांनी अपयशातून शिकण्याचे महत्त्व सांगितले आहे. त्यांनी ‘लिप फ्रॉगिंग’ अयशस्वी झाल्याची उदाहरणे आणि त्यामागची कारणे यांचे विश्लेषण केले आहे. या अपयशाचे परीक्षण करून अडथळ्यांना योग्य दिशा देऊन ‘लिप फ्रॉगिंग’चे अनुकरण करतांना असलेला धोका कसा न्यून करता येईल, याविषयी दृष्टीकोन दिला आहे.

११. ‘लिप फ्रॉगिंग’विषयीची मार्गदर्शक सूत्रे

या पुस्तकाच्या शेवटी डॉ. माशेलकर आणि पंडित यांनी ‘लिप फ्रॉगिंग’विषयी महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या देशांसाठी मार्गदर्शक नकाशा दिला आहे. ‘लिप फ्रॉगिंग’विषयी वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी त्यातील महत्त्वाच्या पायर्‍या आणि धोरणे व्यवहारातील उदाहरणांसह स्पष्ट केली आहेत. या नकाशामध्ये धोरणांमधील सुधारणा, संशोधन आणि विकास यांमधील गुंतवणूक, नाविन्यतेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणे अन् भक्कम भागीदारी सिद्ध करणे यांविषयी सांगितले आहे.

१२. पुस्तकाविषयी निष्कर्ष 

हे पुस्तक विचार करायला प्रवृत्त करणारे आणि माहितीपूर्ण असून या पुस्तकात विकसनशील देशांना जलद प्रगती साधण्यासाठी ‘लिप फ्रॉगिंग’ या संकल्पनेविषयी माहिती दिली आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर आणि रवि पंडित यांनी आर्थिक वाढ अन् नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याची इच्छा असणार्‍यांनी ‘लिप फ्रॉगिंग’ कार्यवाहीत आणावे, यांवर भर दिला असून त्याविषयी व्यावहारिक मार्गदर्शन केले आहे. धोरणे ठरवणारे, उद्योजक आणि ज्याला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ‘लिप फ्रॉगिंग’चे चलनशास्त्र जाणून घेण्यास रस आहे, अशा कोणत्याही व्यक्तीने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. ‘भारताने विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोन ठेवावा’, याविषयी आग्रह धरणारा युक्तीवाद या पुस्तकात केला आहे. परिवर्तनकारी भविष्यकाळासाठी धोरणे ठरवणारे, उद्योजक आणि नागरिक या तिघांनीही काय करावे? याविषयी हे पुस्तक दिशादर्शन करणारे आहे.’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.