पुणे येथील अमली पदार्थ प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची सरकार पक्षाची मागणी !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – येथील एफ्.सी. रस्त्यावर असलेल्या ‘लिक्विड लीजर लाउंज’ (एल्.-३) बारमध्ये झालेल्या मेजवानीत अमली पदार्थ पुरवठा केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ओंकार सकट याने कासेवाडीमधील एकाकडून अमली पदार्थ घेतल्याचे पोलीस अन्वेषणात समोर आले आहे. त्या व्यक्तीकडून सकटने अमली पदार्थ घेतले होते. त्यानंतर ते अभिषेक सोनावणेकडून करण मिश्रापर्यंत पोचले होते, अशी माहिती साहाय्यक सरकारी अधिवक्ता श्रीधर जावळे यांनी न्यायालयाला दिली आहे. अधिक अन्वेषण करायचे असल्याने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकार पक्षाने केली आहे.

सोनावणे याने एल्.-३ बारमध्ये झालेल्या मेजवानीच्या वेळी कुणाकुणाला अमली पदार्थ दिले होते, याविषयी इतर आरोपींच्या समक्ष विचारपूस करायची आहे. आरोपींची अंगझडती केल्यावर त्यांच्याकडे कोकेन आणि मॅफेड्रोन हे अमली पदार्थ मिळाले. त्यांचा वावर असलेल्या अन्य ठिकाणांची माहिती घेऊन त्या ठिकाणांची झडती घ्यायची आहे. त्यांच्या भ्रमणभाषच्या विश्लेषणावरून अन्य आरोपींचे अन्वेषण करायचे आहे. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कोण ? तसेच त्यांचे अन्य कुणी साथीदार त्यांना अमली पदार्थ पुरवण्यास साहाय्य करतात, याविषयीचे अन्वेषण करायचे असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकार पक्षासह अन्वेषण अधिकारी चंद्रशेखर सावंत यांनी न्यायालयाला केली.

आरोपींचे अन्वेषणास असहकार्य !

एल्.-३ बारमधील मेजवानीत पुरवण्यात आलेले अमली पदार्थ कुठून आणले, याविषयी आरोपींकडे अन्वेषण करतांना आरोपी अन्वेषणास सहकार्य करत नाहीत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली, तसेच इडोको या परकीय नागरिकाकडे पारपत्र तसेच त्याच्या निवासाविषयी विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.