स्‍त्रीवादी संघटनांनी महिला सशक्‍तीकरणाच्‍या नावाखाली हिंदु समाजात फूट पाडली ! – प्रा. मधु पूर्णिमा किश्‍वर, संपादिका, मानुषी, देहली

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा सहावा दिवस : अधिवक्‍त्‍यांचे न्‍यायालयीन कार्य आणि संघर्ष

प्रा. मधु पूर्णिमा किश्‍वर

विद्याधिराज सभागृह – कायद्याचे पालन केले पाहिजे, कायदा हातात घेऊ नये, याविषयीची शिकवण केवळ हिंदूंना दिली जाते. पोलीस आणि अधिवक्‍ता याचा अपलाभ उठवून निष्‍पाप हिंदूंना फसवण्‍याचे काम करत आहेत. स्‍त्रीवादी स्‍वयंसेवी संघटनांनी समाजसेवेचे मुखवटे घालून आपल्‍याला हवे तसे कायदे संमत करून घेतले. प्रसारमाध्‍यमे, न्‍यायव्‍यवस्‍था, नोकरशाही हे सर्व या स्‍त्रीवादी म्‍हणवणार्‍यांच्‍या हातचे बाहुले झाले आहेत. या स्‍त्रीवादी संघटनांनी महिला सशक्‍तीकरण, गरिबांना शिक्षण, अनुसूचित जाती/जमातींना न्‍याय यांच्‍या नावाखाली हिंदु समाजात फूट पाडली, असे उद़्‍गार देहली येथील ‘मानुषी’ नियतकालिकाच्‍या संपादिका प्रा. मधु पूर्णिमा किश्‍वर यांनी बोलतांना काढले. वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या सहाव्‍या दिवशी ‘स्‍त्रीवाद्यांद्वारे कायद्यांचा वापर करून हिंदु समाज तोडण्‍याचा प्रयत्न’ या विषयावर त्‍या बोलत होत्‍या.

प्रा. मधु पूर्णिमा किश्‍वर पुढे म्‍हणाल्‍या की, या स्‍त्रीवाद्यांनी खोटे आरोप करून हिंदूंना अपकीर्त करण्‍याचे षड्‌यंत्र रचले. या लोकांनी खोटी कथानके रचून जम्‍मूतील हिंदूंवर मोठे आघात केले. त्‍यांना तोंड उघडणे कठीण करून टाकले. त्‍यांनी हिंदूंमध्‍ये अपराधीपणाची भावना वाढीस लावली. मुसलमान लोक बुरहान वानी, दाऊद इब्राहिम यांसारख्‍या आतंकवाद्यांच्‍या समर्थनार्थ रस्‍त्‍यावर उतरले. याच्‍या उलट हिंदु समाज  बलात्‍काराच्‍या आरोपातून निर्दोष सुटका झाल्‍यानंतरही हिंदु संतांच्‍या समर्थनार्थ पुढे सरसावले नाहीत.

हिंदु समाजामध्‍ये महिलांवर अत्‍याचार होत असल्‍याची खोटी कथानके बनवून हिंदु धर्माला अपकीर्त केले गेले आणि हा अन्‍याय दूर करण्‍याच्‍या नावाखाली न्‍यायालयांकडून कायदे संमत करून घेतले गेले. हे कायदे पाश्‍चात्त्य देशांमध्‍ये आवश्‍यक होते; कारण तेथे चेटकीण आदी प्रकार अस्‍तित्‍वात होते. भारतीय संस्‍कृतीत स्‍त्रीशक्‍तीला दैवीशक्‍ती संबोधण्‍यात आले आहे, असे प्रा. मधु पूर्णिमा किश्‍वर यांनी सांगितले.