वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा पाचवा दिवस (२८ जून) : मंदिर संस्कृती रक्षणाचे प्रयत्न

श्री तुळजापूर मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आंदोलन उभारायला हवे ! – किशोर गंगणे, महाराष्ट्र मंदिर महासंघ, धाराशिव

श्री. किशोर गंगणे

श्री तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीमध्ये प्राप्त झालेले पैसे, दागिने यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदार आणि विश्वस्त यांनी संगनमताने देवनिधीची लूट केली. तुळजापूर देवस्थानमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केल्यावर सरकारने सी.आय.डी.द्वारे अन्वेषण चालू केले; मात्र या प्रकरणी अद्याप कारवाई झालेली नाही. याविषयी पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. त्यानंतर न्यायालयाने विश्वस्तांवर खटला प्रविष्ट करण्याचा आदेश दिला. हा आदेश देऊन ५० दिवस झाले, तरी त्यावर कारवाई झालेली नाही. या भ्रष्टाचारामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि मंदिरांचे विश्वस्त गुंतले आहेत. याची चौकशी संथगतीने चालू आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. श्री तुळजापूर मंदिरातील या भ्रष्टाचाराच्या विरोधात जिल्हाजिल्ह्यांमध्ये आंदोलन उभारायला हवे.


अमेरिकेतील ‘मायन’, ‘अजटेक’ आणि ‘इन्कास’ या संस्कृती (सिव्हिलायझेशन) सनातन धर्माशी संबंधित होत्या ! – प्रवीण कुमार शर्मा, वैदिक प्रवचनकार आणि आंतरराष्ट्रीय हिंदु संशोधकर्ते, तेलंगाणा

श्री. प्रवीण कुमार शर्मा

सनातन धर्म हा वैश्विक धर्म आहे. तो भारतापुरता सीमित नव्हता. संपूर्ण पृथ्वीवर सनातन धर्म पसरला होता. पूर्वीच्या काळातील अमेरिकेतील  ‘मायन’, ‘अजटेक’ आणि ‘इन्कास’ या संस्कृती (सिव्हिलायझेशन) सनातन धर्माशी संबंधित होत्या. हिंदूंच्या अतीसहिष्णुतेमुळे ती संस्कृती सर्वत्र टिकून राहू शकली नाही. नंतर निर्माण झालेल्या पंथांतील लोकांनी तलवारीच्या बळावर जगावर प्रभुत्व मिळवले आणि सनातन धर्माची पुष्कळ मोठी हानी केली. मध्यपूर्व देशांतून आक्रमकांनी भारतावर आक्रमण केले. येथील संस्कृतीची हानी केली. त्यांनी आपले ग्रंथ नष्ट केले; मात्र आपली संस्कृती ते नष्ट करू शकले नाहीत, असे  उद्गार तेलंगाणा येथील वैदिक प्रवचनकार आणि आंतरराष्ट्रीय हिंदु संशोधकर्ते प्रवीण कुमार शर्मा यांनी काढले.
ते पुढे म्हणाले की, वेद ही जागतिक राज्यघटना (संविधान) आहे. अणु-रेणूत सनातन धर्म आहे. वसुधैव कुटुम्बकम् । (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) आणि ‘सर्वे भवन्तु सुखिन: । (अर्थ : सर्व प्राणीमात्र सुखी होवोत), ही आपली शिकवण आहे. पूर्वी जगभरात भगवान राम, गरूड यांची पूजा व्हायची. सर्वत्र यज्ञ संस्कृती होती. सनातन धर्मात सर्व ज्ञान अंतर्भूत आहे. सनातन धर्म नैसर्गिक आहे. तो अनादी अनंत आहे. आपत्काळात केवळ सनातन धर्मच आपले रक्षण करणार आहे.


मठ-मंदिरांच्या माध्यमातून संस्कार झाल्यास समाजातील गुन्हेगारी थांबेल ! – मदनमोहन उपाध्याय, संस्थापक, ‘मिशन सनातन’, रायपूर, छत्तीसगड

मदनमोहन उपाध्याय

विद्याधिराज सभागृह – मठ आणि मंदिरे सनातन हिंदु धर्माचे आधारस्तंभ आहेत.  लोकांमध्ये चांगले संस्कार रुजवल्यास त्यांच्या विचारांमध्ये पालट होतील. त्यामुळे समाजातील गुन्हेगारी थांबेल आणि हे मठ-मंदिरांच्या माध्यमातून शक्य होईल, असे प्रतिपादन रायपूर येथील ‘मिशन सनातन’चे संस्थापक मदनमोहन उपाध्याय यांनी केले.

मदनमोहन उपाध्याय म्हणाले, ‘‘आधी मंदिरात पुजार्‍यांकडून भाविकांचा आजार पाहून औषधीयुक्त प्रसाद दिला जात होता. मंदिरांच्या गोशाळा, संगीत शाळा, मल्लशाळा होत्या. त्या आखाड्यांमधून सिद्ध होणारे युवक समाजाचे रक्षण करत होते. सध्या कोट्यवधी रुपयांचे मंदिर बांधले जाते; पण देवतेच्या पूजेसाठी अल्प रकमेत पुजारी ठेवले जातात आणि त्यांच्याकडून अधिक कामांची अपेक्षा केली जाते. त्यामुळे मंदिरांनी योग्य पुजारी ठेवणे आवश्यक आहे, तसेच त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मंदिर विश्वस्तांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या समवेतच श्रीमंत मंदिरांनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत मंदिरांना दत्तक घेतले पाहिजे. ‘मिशन सनातन’ संस्थेकडून ३ गुरुकुल निशुल्क चालवले जातात, ज्यात १ सहस्र ८ मुले शिक्षण घेत आहेत. येत्या ५ वर्षांत २० सहस्र मुलांना गुरुकुलमध्ये शिकवण्याचे नियोजन आहे.


मंदिराचे व्यवस्थापन भाविकच अधिक चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात ! – प्रदीप विष्णु तेंडोलकर, श्री जीवदानी देवी संस्थान, पालघर, महाराष्ट्र

श्री. प्रदीप विष्णु तेंडोलकर

विद्याधिराज सभागृह – मंदिरांच्या सुव्यस्थेसाठी स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक आहे, तसेच स्थानिक लोकांनी मंदिरांचे व्यवस्थापन पाहिले पाहिजे. जेथे सरकारी व्यवस्था अपयशी होते, तेथे मंदिरांनी पुढे आले पाहिजे. मंदिरांच्या सुव्यवस्थापनासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, तर अन्य स्वयंसेवी संस्था आणि समाज आपल्यासमवेत येतो, तसेच व्यवस्थापनाने लहान लहान पालट केले, तर देशाच्या ‘जीडीपी’मध्ये मंदिरांचा मोठा सहभाग राहू शकतो, असे प्रतिपादन पालघर येथील श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडोलकर यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या ५ व्या दिवशी केले.

मंदिराचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे कसे करू शकतो ? हे सांगतांना श्री. तेंडोलकर म्हणाले, ‘‘जीवदानी मंदिरे हे डोंगरावर १ सहस्र ५०० फूट उंचीवर आहे. त्यामुळे १ सहस्र ४०० पायर्‍या चढून मंदिरात दर्शनासाठी जावे लागत होते. त्यामुळे भाविकांच्या सुविधेसाठी मंदिराने सरकारकडे ‘बीओटी’ स्तरावर ‘फनिकुलर रोपवे ट्रेन’चा (तीव्र चढ किंवा उतार याठिकाणी वापरला जाणारी रोपवे रेल्वे) प्रस्ताव ठेवला होता. त्यासाठी १०० कोटी रुपये अपेक्षित होते; पण १३ वर्षे सरकार ते काम करू शकले नाही. त्यानंतर मंदिर व्यवस्थापनाने ते काम अडीच वर्षात केवळ ३२ कोटी रुपयांमध्ये पूर्ण केले. मंदिरामध्ये लक्षावधी नारळ येत होते. ते मंदिराबाहेर विकले जात होते. ते नारळ भाविकांच्या माध्यमातून परत मंदिरात येत होते, हे टाळण्यासाठी मंदिराने नारळ वडी बनवण्याचा उपक्रम राबवला. त्यामुळे ६ लाख नारळ विक्रीतून ६६ लाख मिळत होते, आता नारळाची वडी प्रसाद म्हणून उपयोगात आणली जात असल्याने प्रतिवर्षी अडीच कोटी रुपये मिळतात. मंदिराच्या वतीने आदिवासी आणि मंदिर परिसरातील गरीब लोकांसाठी प्रतिवर्षी २ सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. मंदिराकडून शाळा चालवली जाते, ज्यात ३ सहस्र विद्यार्थी शिकतात. मंदिरात पुष्कळ प्रमाणात चांदी पडून होती. ती विकून त्या पैशात दुर्लक्षित झालेल्या दत्त मंदिराचा जिर्णाेद्धार करण्यात आला. अल्प मूल्यामध्ये ‘डायलिसिस सेंटर’ चालवण्यात येते. यासमवेत वार्षिक महोत्सवाच्या सुव्यवस्थेसाठी परिसरातील शाळा-महाविद्यालयांतील ‘एन्.सी.सी.’च्या मुलांचे साहाय्य घेतले जाते. अशा प्रकारे आम्ही ३५ वर्षे मंदिराचे व्यवस्थापन पाहिले.’’


कंधार (जिल्हा नांदेड) येथील मारुति मंदिराच्या परिसरातील अधिकृत दुकाने पाडण्याची कारवाई मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर थांबली ! – गणेश महाजन, मारुति मंदिर विश्वस्त, कंधार

श्री. गणेश महाजन

विद्याधिराज सभागृह – कंधार (जिल्हा नांदेड) येथे पुरातन मारुति मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरातील दुकाने पाडण्यासाठी प्रशासनाचे बुलडोझर पोचल्याची माहिती गोवा येथे चालू असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त मारुति मंदिराचे विश्वस्त श्री. गणेश महाजन यांना मिळाली. ही सर्व दुकाने अधिकृत असल्याने ती पाडणे, हे दुकानदारांवर अन्यायकारक होते. त्यामुळे त्यांनी याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांना दिली. त्यानंतर याविषयीची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोचली. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्वरीत सूत्रे हालवली. त्यानंतर मंदिराची दुकाने पाडण्यासाठी पोचलेले बुलडोझर घटनास्थळावरून निघून गेले. याविषयीचा घटनाक्रम मारुति मंदिराचे विश्वस्त श्री. महाजन यांनी या महोत्सवात सांगितला.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला सहकार्य करावे ! –  गणेश महाजन

मारुति मंदिर परिसरातील दुकाने तोडण्याची कारवाई थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर श्री. गणेश महाजन म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचा संघटन उपक्रम अतिशय चांगला आहे. त्याला सर्व मंदिर विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे तुमच्याकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही.’’